लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या असून गेल्या महिनाभरापासून असा एकही दिवस नाही की, त्या दिवशी दुचाकी चोरी झालेली नाही. शनिवारी तर कहरच झाला, एकाच दिवसात चार दुचाकी चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. यापैकी एक घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून दुसरी जिल्हापेठ दोन घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. रविवारी या दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली आहे.
एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना दुसरीकडे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. दोन महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरी करणारी टोळी पकडली होती. त्यांच्याकडून वीस ते पंचवीस दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या होत्या. मात्र या सर्व दुचाकी जळगाव शहराच्या बाहेरील होत्या. जळगाव शहरातील एकही दुचाकी यात नव्हती. गेल्या आठवड्यात काही दुचाकी चोरट्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन, दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत,मात्र या देखील दुचाकी जळगाव शहराच्या बाहेरच्याच निघाल्यात. चोपडा, अमळनेर चाळीसगाव ,जामनेर व भुसावळ या भागातील या दुचाकी असल्याचे उघड झाले. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी होत असताना एकही दुचाकी चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही किंवा जे चोर पकडले त्यांच्याकडून शहरातील दुचाकी हस्तगत करण्यात आलेली नाही.
यांच्या दुचाकी झाल्या चोरी
कृष्णा कडुबा काडजे ( ४६,रा.तोंडापुर, ता. जामनेर) या शेतकऱ्याची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी ( क्र.ए.एच.१९ ए.झेड.४००२) सात मे रोजी जिल्हा रुग्णालयातून चोरी झालेली आहे.
अजिंठा चौकानजीक असलेल्या एका हॉटेलच्या बाहेर पार्किंग केलेली विनोद रवींद्र बिडकर (२६ रा. रामेश्वर काॅलनी) या तरुणाच्या मालकीची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ सी.सी.५५७३) लांबविण्यात आलेले आहे. त्याशिवाय नजीर हुसेन शेख जाकीर ( रा.शामा फायर समोर, तांबापुरा) या तरुणाची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी ( क्र.एम.एच.१९ बी.एक्स.८८७१) राहत्या घरासमोरुन तर ललित प्रवीण मोरे ( रा.गणेश नगर) या तरुणाची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.बी.६३००) दुध फेडरेशन समोरील अपार्टमेंट मधून चोरी झालेली आहे. या चारही दुचाकींच्या चोरी प्रकरणात अनुक्रमे जिल्हापेठ एमआयडीसी व शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकच अंमलदार करणार तपास
दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस ठाणे पातळीवर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अमलदाराकडे सोपविण्यात येत होता. संबंधित अंमलदाराकडे वेगवेगळी कामे सोपविली जात असल्याने त्याचा परिणाम तपासावर होत होता. तपासाला गती यावी यासाठी आता दुचाकी चोरीचा तपास एकाच अंमलदाराकडे सोपविण्याचे आदेश आपण काढलेले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ''लोकमत''ला दिली.
कोट....
दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या घटना उघडकीस आणण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कामाला लावण्यात आलेली आहे. थोड्याच दिवसात याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. दुचाकी चोरीच्या घटना कमी होण्यासह चोरटे जेरबंद होतील व दुचाकी देखील मिळतील.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक