जळगाव : नांदुरा, जि.बुलडाणा येथे फिरायला गेलेल्या जळगाव पोलिसासह चौघांनी सौरभ देशमुख या आयटीआयच्या विद्यार्थ्याला पिस्तुलचा धाक दाखवून तसेच त्याच्या डोक्यात उलटा पिस्तुल मारुन सोन्याची अंगठी व सोनसाखळी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात नांदुरा पोलिसांनी पोलीस मुख्यालय कार्यरत असलेल्या कुणाल विठ्ठल सोनवणे (रा.भुसावळ) याला सोमवारी जळगावातून अटक केली. या घटनेमुळे पुन्हा खाकीच्या इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस मुख्यालयात आरसीपी ३ मध्ये कार्यरत असलेला कुणाल विठ्ठल सोनवणे हा त्याचे भुसावळात मित्र अक्षय सोनवणे, ललित लकडे व आणखी एक असे चौघं जण २८ रोजी नांदुरा येथे कारने फिरायला गेले होते. तेथे त्यांनी त्यांचा मित्र सौरभ देशमुख यालाही बोलावून घेतले. रात्री साडे नऊ वाजता दारुच्या नशेत या चौघांनी सौरभ याला मारहाण केली तर कुणाल याने सौरभ याच्या डोक्यात उलटा रिव्हॉल्वर मारुन जखमी केले तसेच डोक्याला रिव्हॉल्वर लावून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी व अंगठी काढून घेत त्याला जखमी अवस्थेत सोडून पलायन केले. उपचार झाल्यानंतर सौरभ याने सोमवारी नांदुरा पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन कुणालसह चौघांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदुरा पोलिसांचे एक पथक तातडीने जळगावला रवाना झाले. रात्री संशयिताला अटक करुन हे पथक परत झाले.तीन दिवस फोन करुनही प्रतिसाद नाहीया घटनेतील जखमी सौरभ, कुणाल व त्याचे मित्र असे सर्व जण एकमेकाला ओळखतात. त्यांची चांगली मैत्री आहे. त्यामुळे सौरभ याने अन्य दोघांना फोन करुन अंगठी व सोनसाखळी परत मागितली, मात्र त्यांनी तुझ्या वस्तू कुणालकडे आहेत. २० हजार रुपये दिले तरच त्या मिळतील असे सांगितले. त्यामुळे सौरभ याने पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, कुणाल याच्या एका मित्रावर खुनाचाही गुन्हा दाखल असून तो निर्दोष झाला आहे. अन्य बाकीचेही गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. कुणाल हा पोलीस असूनही गुन्हेगारी करणाऱ्या तरुणांच्या संपर्कात आहे.पोलीस पथक धडकले जळगावातगुन्हा दाखल झाल्यानंतर नांदुरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब व चार कर्मचारी अशांचे पथक सायंकाळी जळगावात दाखल झाले. या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती दिली. त्यानंतर कुणाल याला मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री नऊ वाजता हे पथक नांदुराकडे रवाना झाले.अनुकंपावर लागला पोलीस दलात नोकरीलाकुणाल सोनवणे वडीलांच्या जागेवर अनुकंपावर पोलीस दलात नोकरीला लागला ्रआहे. १ आॅगस्ट २०१६ रोजी तो भरती झाला आहे. त्याचा बक्कल क्र.११३९ असा आहे. तो मुळचा भुसावळचा रहिवाशी आहे.खाकीला डागाळलीगेल्या दोन वर्षात दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला कुणाल हा दुसरा पोलीस आहे. त्याच्या या कृत्याने ‘खाकी’ डागाळली आहे. बनावट नोटा छापण्याचे प्रकरण असो की लुटमार, विनयभंग, बलात्कार यासारख्या घटनांमुळे जिल्हा पोलीस दल राज्यपातळीवर बदनाम होत आहे.कुणाल सोनवणे या कर्मचाऱ्याला नांदुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर तिथे गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाई नांदुरा पोलीस करतील. त्यांचा अहवाल आल्यावर कुणाल याच्याविरुध्द कारवाई केली जाईल.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक
रिव्हॉल्वरचा धाक दाखवून चौघांनी विद्यार्थ्याला लुटले, जळगावच्या पोलिसाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 1:04 PM