अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:03 PM2019-12-17T22:03:25+5:302019-12-17T22:03:51+5:30
जवखेडे येथील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरचालकांवर मंगळवारी कारवाई केली.
एरंडोल, जि.जळगाव : तालुक्याील जवखेडे येथील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरचालकांवर मंगळवारी कारवाई केली.
१७ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जवखेडे गावातील अंजनी नदी पात्रात समाधान पाटील, गोपाल पाटील, सुधाकर पाटील, बबलू पाटील ह्या ग्रामस्थांनी चार ट्रॅक्टर अंजनी नदी पात्रात थांबवून ठेवले होते. यापैकी दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली होती तर दोन ट्रॅक्टर हे वाळू भरण्यासाठी आले होते. या घटनेबाबत ग्रामस्थांनी पोलीस पाटील यांना कळविले. पोलीस पाटील यांनी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन शी संपर्क साधून माहिती दिली. यावरून एरंडोल पोलीस स्टेशनचे एपीआय तुषार देवरे, हेडकॉन्स्टेबल विकास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल राजू पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टरचालकांना विचारपूस केली. त्यांच्याजवळ वाळू वाहतुकीचे परवाने नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक एमएच-१९-पीयू-३५४४, एमएच-१९-८६९४, एम एच-१९-डीजे-९९३३ व एमएच-१९-सीव्ही-९३८१ असे चार ट्रॅक्टर जप्त केले. या ट्रॅक्टरमध्ये जवळपास १५ हजार रुपयांची वाळू आहे.
दरम्यान, घटनेबाबत जवखेडे येथील पोलीस पाटील महेश वसंत पाटील यांनी स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून संशयित संजय विठ्ठल महाजन रा.एरंडोल, अमोल बाळू पाटील रा.धारागीर, किरण विलास चौधरी रा.एरंडोल, प्रवीण महादू पाटील रा.धारागीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.