सोनगीर येथील पोलीस उपनिरीक्षक सहारे, पोलीस रामकृष्ण बोरसे, सुरज साबळे हे राष्ट्रीय महामार्गावर पॅट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पांढऱ्या रंगाच्या चारचाकीत (एमएच ४३ बीए १५९८) शिरपूरकडून धुळ्याकडे गांजा वाहतूक करीत आहे. ती गाडी येताना दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता त्याने आपली गाडी माघारी परतवून सोनगीरजवळ वाघाडीकडे फिरवली. पोलिसांनी त्या दिशेने पाठलाग केला चालकाने वेगात गाडी चालवून वालखेडा ओलांडून पांझरा नदीतून मांडळ रस्त्याकडे नेण्यास सुरुवात केली असता पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला गाडी उलटी केली आणि गाडी सोडून चालक व त्याच्यासोबत असणारा इसम पळून गेले.
घटनास्थळी सोनगीर पोलिसांनी चारचाकीची तपासणी केली असता त्यात गांजा मिळून आला नाही. बोरसे यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.