चंद्रशेखर जोशीजळगाव : सत्तेची फळे चाखणाऱ्या भाजपास सत्ता मानवत नसल्याचीच प्रचिती गेल्या काही वर्षांपासून येत आहे. जळगाव पाठोपाठ धुळ्यातही पक्षांतर्गत वाद सुरू आहेत. जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पहाता एकेकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जिल्ह्याची ओळख होती. स्व. मधुकरराव चौधरी, जे.टी. महाजन, अरूणभाई गुजराथी यांच्या सारखे दिग्गज नेते एकेकाळी कॉँग्रेसकडे होते. अरूणभाई गुजराथी हे आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आहेत. मात्र हळूहळू उतरती कळा कॉँग्रेसला लागली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रस पक्षाला एकाही जागेवर यश मिळू शकले नाही. या विरूद्ध परिस्थिती भाजपा-शिवसेनेची झाली. नव्वदीच्या दशकात भाजपाने मुसंडी मारली ती नंतर कायम ठेवत एक-एक जागा या पक्षाने आपल्या ताब्यात घेतली. आज जिल्ह्यात या पक्षाचे प्राबल्य असल्याचेच दिसून येते. विधानसभेत सहा आमदार, विधानपरिषदेत दोन आमदार, दोन खासदार, जिल्हा परिषदेत सत्ता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत सत्ता, सहकारातील दूध संघ ताब्यात असे चौफेर यश या पक्षाला मिळालेले आहे. मात्र तीन वर्षापासून पक्षांतर्गत बंडाळीचा उद्रेक अधुन-मधून सुरू असतो. राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळात सर्वात अगोदर संधी मिळाली ती पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना. त्यांच्याकडे महसूल, कृषीसह बारा खात्यांची जबाबदारी होती. २०१६ मध्ये मात्र खडसेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. यातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून पक्षात दोन गट निर्माण झाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांच्यातील वैर गंभीर वळणावर आहे. पूर्वी एक मेकांना टोमणे मारणे इथपर्यंत हा विषय होता. आता उघडपणे दोघे एकमेकांबद्दल बोलत असतात. कार्यकर्त्यांचीही त्यामुळे विभागणी झाली आहे. गेल्या आठवड्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जिल्ह्यात आले होते. भुसावळ येथील पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी दानेवेंना धारेवर धरले. जळगावी आल्यावर दानवे काहीसे वैतागात होते. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले... ‘पक्षाचे काय करावे आता तुम्हीच सांगा...’ त्यांचा वैताग उघड जाणवत होता. त्यानंतर दानवे धुळ्यात गेले होते. तेथेही अनिल गोटे व त्यांच्यात वाद झाला. धुळ्याच्या निवडणुकीत भाजपातील वाद, गटबाजी उघडपणे सुरू आहे. गोटेंची मुख्यमंत्र्यांनी समजूत घातली मात्र आता पुन्हा त्यांनी बंडाचे निशान हाती घेतले आहे. नंदुरबारमध्येही गावीत कुटुंबिय नाराज आहेत. त्यामुळे भाजपात संघर्षाच्या ठिकगी पडल्याचीच प्रचिती येत आहे.