जळगाव : एमआयडीसीमध्ये प्लॅस्टिक दाण्याची कंपनी सुरू करण्याचे आमिष दाखवून गुजरात राज्यातील नवसारी येथील सुलेमान इस्माईल दिलेर या शेतक-याची ५ लाख ८६ हजार ५८१ रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी जावेद सलिम पटेल (रा. गणेशपूरी) यास अटक करण्यात आली आहे. बुधवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येईल.
गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील वेश्मा येथील सुलेमान इस्माईल दिलेर हे रहिवासी आहेत़ शेती करून ते कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. तडकेश्वर येथे त्यांची गणेशपूरी भागातील जावेद सलिम पटेल यांच्याशी २०१४ मध्ये ओळख झाली. जावेद याची सुरत येथील ऊनपाटीया येथे प्लॅॅस्टिक दाण्याची कंपनी आहे. त्यामुळे जळगावात सुध्दा पन्नास टक्के भागीदारीने कंपनी सुरू करण्यासाठी सुलेमान यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले.
पैसे देण्यास टाळाटाळ
कंपनी सुरू झाली, काही महिन्यानंतर सुलेमान दिलेर यांनी जावेद पटेल याला नफ्याची रक्कम मागितली. वेळोवेळी पैशांची मागणी करूनही तो पैसे देत नव्हता. अखेर २०१७ मध्ये जावेदने ९० हजार रुपये रोख परत केले. नंतर कंपनी बंद केल्याचे त्याने सांगितले. पुन्हा कंपनी सुरू करण्यासाठी त्याने दोन लाख रूपयांची त्यांच्याकडे मागणी केली. पुन्हा विश्वास ठेवून दिलेर यांनी त्यास पैसे दिले.
अखेर गुन्हा दाखल
दरम्यान, पुन्हा नफ्याची रक्क्म मागून सुध्दा जावेद हा देत नव्हता. अखेर चार ते पाच वेळा बँकेत जवळपास २३ हजार ४१९ रुपये जावेद याने त्यांच्या खात्यावर पाठविले. त्याआधी ९० हजार रूपये दिले. असे एकूण त्याने १ लाख १३ हजार रुपये परत केले. त्यानंतर त्याने पैसे परत केलेच नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळताच, दिलेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी जावेद पटेल याला अटक केली.