नशिराबाद: येथे व परिसरात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतात उभ्या असलेली पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग बेजार झाला असून, नीलगाय (लोधडे)सह वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त व्हावा व उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
नशिराबाद शिवार परिसरात सुनसगाव रोडलगत बेळी रोड भागातील शेत परिसरामध्ये लोधडे नीलगाय यांचा संचार दिवसेंदिवस वाढत आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांमध्ये घुसून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नासधूस मोठ्या करत आहे. त्यामुळे शेतातील हरभरा, दादर परिसरात असलेली केळी आदींचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही ठिकाणी तर उभे पीकच उद्ध्वस्त केली असल्याची माहिती शेतकरी देत आहे. अनेकदा ओरड करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे,असे शेतकरीवर्ग सांगत आहे. आधीच हातातोंडाशी आलेला खरिपाचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणा व अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. त्यातच रब्बीच्या हंगामात लोधड्यांचा नासधूस वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. नुकसानग्रस्त भागाची तत्काळ पाहणी व पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. त्यासोबत वन्यप्राण्यांचा बंदोबस्त व उपाययोजना तत्काळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.