चाळीसगावी कोरोना उपचार केंद्रात खासगी डॉक्टरांची विनामूल्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 11:13 AM2020-11-01T11:13:01+5:302020-11-01T11:13:55+5:30
खासगी डॉक्टर कोरोना उपचार केंद्रात विनामूल्य सेवा देत आहेत.
चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांतून सामाजिक संघटनांच्या सहभागाने उभारलेल्या कोरोना उपचार केंद्रात शहरातील खासगी डॉक्टर देखील विनामुल्य वैद्यकीरा सेवा देत आहे. वैद्यकीय कर्मचा-यांना अचूक मार्गदर्शनही करीत आहे. डॉक्टरांच्या या सामाजिकदायित्वाचे कौतुक होत आहे.
शहर व ग्रामीण परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत गेल्यानंतर धुळे रोड लगतच्या ट्रामा केअर केंद्रात लोकसहभागातून अद्ययावत कोरोना उपचार केंद्र सुरु केले गेले. यामुळे अनेक रुग्णांवर येथे उपचार झाले. सद्यस्थितीत बाधितांची संख्या कमी होत असली तरी, वैद्यकीय सेवा मात्र सज्ज आहे. गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार झाल्याने काहींना जीवनदानही मिळाले.
शहरातील खासगी वैद्यकीय सेवा देणारे भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ यासह एम.डी.मेडीसीन, जनरल फिजिशियन, अस्थिरोगज्ञ व बालरोगतज्ञ अशा ६० डॉक्टरांनी १० अॉगस्ट ते ३० नोव्हेंबर पर्यंत ८१ दिवसात दरदिवशी दोन याप्रमाणे रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोरोना उपचार केंद्रात येऊन सेवा दिली. आयएमए संघटनेच्या आवाहनानुसार ही सेवा दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जोवर कोरोनाचे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत सेवा दिली जाईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
आयएमए संघटनेने कोरोना काळात डॉक्टरांना वैद्यकीय उपचाराविषयी केलेल्या अवाहनानुसार ६० डॉक्टरांनी ८१ दिवस कोरोना उपचार केंद्रात दरदिवशी दोन याप्रमाणे विनामुल्य वैद्यकीय सेवा दिली. ही सेवा पुढेही सुरुच राहणार आहे.
- डॉ. स्मिता मुंदडा, तालुकाध्यक्ष, आयएमए, चाळीसगाव.