मालवाहतूक एसटी अडकली 'अमृत'च्या खड्डयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 12:04 PM2020-10-25T12:04:20+5:302020-10-25T12:04:58+5:30
जळगाव : अमृत योजनेच्या कामामुळे पडलेल्या खड्डयात मालवाहतूक करणारी बस अडकल्याची घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास पिंप्राळा रस्त्यावरील ...
जळगाव : अमृत योजनेच्या कामामुळे पडलेल्या खड्डयात मालवाहतूक करणारी बस अडकल्याची घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास पिंप्राळा रस्त्यावरील यश लॉनजवळ घडली. सुदैवाने यात कुणालाही दुखपत झालेली नाही. मात्र, रस्त्याच्या मधोमध बस उभी राहिल्यामुळे ये-जा करण्यासाठी तो रस्ता बंद झाला होता.
भुसावळ डेपोची मालवाहतूक बस (क्र. एमएच.१४.बीटी.०४४३) ही रविवारी सकाळी मालाची पोहोच करण्यासाठी ओरंगाबादहून जळगाव शहराच्या दिशेने निघाली होती. सकाळी ११ वाजता बस शहरात दाखल झाल्यानंतर भिकमचंद जैन नगर भागातील नितीन एजन्सीकडे येत होती. पिंप्राळा रस्त्यावरील यश लॉनजवळून वळन घेत असताना, अचानक ही बस अमृत योजनेचे काम केल्यामुळे झालेल्या खड्डयात अडकली. अर्ध्याच्यावर चाक खाली गेल्याने बसचा संपूर्ण तोल हा डाव्या बाजूला गेला होता. दरम्यान, ही मालवाहतूक बस ही खड्डयात अडकून रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्यामुळे तो रस्ता संपूर्ण ये-जा करण्यासाठी बंद झाला होता. काही वेळानंतर ही बस खड्डयातून बाहेर काढण्यात आली.