भुसावळ : आरटीओ शिबिरात वाहनचालकांना पक्के लायसन्स देण्यासाठी डमी उमेदवार उभा करून व अर्जावर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो चिकटवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात ३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी फरार आरोपी गणेश कौतिकराव ढेंगे (जळगाव) यास शनिवारी सायंकाळी जळगाव रोडवरील जॉली पेट्रोल पंपाजवळून गोपनीय माहितीच्या आधारे अटक करण्यात आली.
उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक घनश्याम दिलीप चव्हाण (रा. गणेश कॉलनी) हे ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत शिबिर दौऱ्यावर असताना २६ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला मोकळ्या जागेत पक्क्या लायसन्ससाठी अर्जदारांची चाचणी घेत असताना राजेश सिंधी ऊर्फ सुक्का हा त्या ठिकाणी आला आणि त्याच्याकडील उमेदवारांचे अर्ज त्याने अधिकाऱ्यांकडे दिले. या अर्जातील चेतन पांडुरंग पाटील यांच्या अर्जासह कागदपत्रांची पाहणी केली असता त्याच्या फॉर्मवर संगणीकृत असलेला फोटो नसून त्याठिकाणी दुसरा फोटो चिकटविलेला आढळून आला. उमेदवार बनावट असल्याची कुणकुण लागलाच अधिकाऱ्यांनी राजेश सिंधी याच्या सोबत असलेल्या व्यक्तीला ओळखपत्र दाखविण्याबाबत विचारणा केली; परंतु पाकीट घरी राहिले आहे, असे त्या बनावट उमेदवाराने सांगितले. त्यानंतर फॉर्मवर असलेली सही व बनावट उमेदवाराने केलेली सही यांची तुलना केली असता दोघांमध्ये फरक दिसून आला. थोड्या वेळानंतर पुन्हा राजेश सिंधी याने हेमंत नरेंद्र शर्मा या दुसऱ्या उमेदवाराचा फॉर्म आणला. यावरदेखील संगणकीकृत फोटोऐवजी दुसरा फोटो चिकटविलेला असल्याने त्याला याबाबत विचारणा केली. यावर जाने दो साहब... पास कर दो, असे तो म्हणाला. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गणेश ढेंगे हा त्याठिकाणी आला. त्याने घनश्याम पाटील यांच्यासोबत अरेरावी करीत त्याच्या हातातील कागदपत्रे त्यांच्या टेबलावर फेकून दिली तसेच माझ्या उमेदवारांचे अर्ज पास करून द्या नाही तर मी तुम्हाला कामाला लावेन, असे म्हणत त्याठिकाणाहून तो निघून गेला. राजेश सिंधी याने चंदन फकीरसिंग, हेमंत नरेंद्र शर्मा व चेतन पांडुरंग पाटील या तिघांच्या फॉर्मवर बनावट फोटो लावून स्वाक्षरी बनावट करून बनावट उमेदवार उभे करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या तिघांसह धमकी दिल्याप्रकरणी राजेश सिंधी ऊर्फ सिक्का, गणेश ढेंगे यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात ३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपींचा कसून शोध सुरू होता.
पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, सुरेश महाजन, साहील तडवी आदींनी सापळा रचून आरोपीला अटक केली.