बोदवड : शेलवड येथील सरपंचांच्या कुटुंबातील आठ सदस्यांच्या नावानेही शौचालयाचा निधी परस्पर काढल्याचा प्रकार समोर येत आहे. ग्रामस्वच्छतेच्या नावावर दहा वर्षांपूर्वी निधन झालेल्या काकांच्या नावाचा निधीही हडप करण्यात आला आहे.
शेलवडच्या घोटाळेबाज ग्रामपंचायतीमधील रोज नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. गावातील ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक बाळू रामदास चौधरी यांनी सन २०१६-१७ मध्ये रोजगार हमीतून शौचालय बांधले आहे. तेच शौचालय त्यांच्या नावावर पुन्हा दाखवण्यात आले आहे आणि निधी काढून घेण्यात आला आहे.
शेलवड ग्रामपंचायतीचे सरपंच असलेले समाधान बोदडे यांच्या कुटुंबातील आठ जणांचे वेगवेगळे शौचालय दाखवून ८४ हजार रुपयांचा निधी एकट्या सरपंचांच्या कुटुंबातील सदस्यांचा काढण्यात आला आहे. बोदडे यांचे दोन काका आहेत. ते अनुक्रमे दहा आणि सात वर्षांपूर्वीच मरण पावले आहेत. दिव्यांगालाही सोडले नाही. गावातील महेंद्र विष्णू माळी या दिव्यांग व्यक्तीने शौचालयासाठी अर्ज दिला. त्यात त्याने पदरमोड करून शौचालय बांधून घेतले आणि विचारणा केली असता अद्याप शौचालय मंजूर झाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे जामनेर येथे शेलवड ग्रामपंचायतीच्या नावाने उघडलेल्या खात्यातून त्याच्या नावाचा निधी काढण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या दीपक माळी यांचे वडील संतोष सुपडू माळी यांच्या नावानेही शौचालय आता शासकीय अनुदानात बांधण्यास सुरुवात केली आहे, परंतु मंजुरीसह निधी अगोदरच काढलेला आहे.
कोट
आपले पेमेंट अडकू नये म्हणून बांधकाम ठेकेदारानेच मयत लोकांच्या नावाने प्रस्ताव तयार केले आहेत. संबंधित तालुका समन्वयक यांचे काम प्रत्यक्ष पाहणी करण्याचे होते. तसेच मयताच्या नावाने खाते उघडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण पेमेंट ठेकेदाराच्या नावावर वर्ग करण्यात आले आहे.
- संदीप निकम, तत्कालीन ग्रामसेवक