चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे आज गैबनशहा बाबांचा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 04:31 PM2019-12-18T16:31:51+5:302019-12-18T16:32:07+5:30
वरगव्हाण येथे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या गैबनशाह बाबांचा यात्रोत्सव १९ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे.
बिडगाव, ता.चोपडा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण येथे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या गैबनशाह बाबांचा यात्रोत्सव १९ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी कव्वालीचाही मुकाबला रंगणार आहे.
वरगव्हाण येथील प्रसीद्ध असलेला गैबनशा बाबांचा यात्रोत्सव म्हणजे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते. दोन्ही समाजांसाठी येथील यात्रा म्हणजे एखाद्या सणाप्रमाणे एकजुटीने साजरा केला जातो. यात्रेच्या आदल्या दिवशी येथे ग्रामस्यांमार्फे बाबांच्या दर्गावर गावातून वाजत गाजत संदल मिरवणूक काढून चादर चढवली जाते. येथील गैबनशा बाबांचा दर्गा प्राचीन आहे. लोकांची अतोनात श्रद्धा असलेल्या या दर्गावर येवून लोक नवस मानतात व इच्छापूर्ती झाल्याने यात्रेच्या दिवशी नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होत असते. यात कोणी लाडू, साखर तुला, पेढा, जिलेबी तुला करून नवस फेडतात. ग्रामस्थांच्या नातेवाईकांसह विविध ठिकाणाहृण येथे भाविक येत असतात. यात्रेनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे. गावातील मंदिर मज्सितसह धार्मिक स्थळांवर आर्कषित रोषणाई करण्यात आली आहे. विविध दुकानेही थाटली आहेत. बच्चे कंपनीसाठी आर्कषक झुलेही गावात दाखल झाले आहेत. विविध खाद्य पदार्थ, खेळणी, आभूषणे, मिठाई, विविध संसारोपयोगी वस्तू अशा अनेक विक्रेत्यांनी गावात आपली दुकाने थाटली आहेत.
गावात येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी लतिब अजमेरी टी.व्ही गायक अजमेरी (यु.पी.) व रोशनी बारसी टी.व्ही गायक मुंबई यांच्यात कव्वालीचा मुकाबला आयोजित केला आहे. यात्रेत बंदोबस्तासाठी अडावद पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.योगेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. यात्रा यशस्वीतेसाठी हिंदू-मुस्लीम पंच कमेटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.