रावेर : मध्यप्रदेशातील छिपाबड व छँगाव माखन येथून अटक केलेल्या खंडवा येथील चौघाही आरोपींना १०० रूपयांच्या नकली चलनी नोटा पुरवणारा रावेर येथील पाँच बिवी चौकात राहणारा आरोपी शेख शाकीर शेख हाफीज (१९) हाच प्रथमदर्शनी मास्टरमाईंड असल्याचे दिसत आहे. त्याने रावेर शहरातही १०० व २०० रूपये किमतीच्या नकली चलनी नोटा चलनात आणण्यासाठी पसरवलेल्या नेटवर्कचा पर्दाफाश करून रावेर पोलिसांनी चार आरोपींना अटक करीत सात हजाराच्या १०० व २०० च्या चलनाच्या नकली नोटा जप्त करण्याची कारवाई केली आहे. तर शेख शाकीरला मध्यप्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हरदा जिल्ह्यातील छिपाबड येथे सुटे करण्याच्या नावाखाली १०० रूपयाच्या नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या खंडवा येथील आरोपी अय्युब मोहंमद इब्राहिम व अबरार मोहंमद इब्राहिम रा. खंडवा यांना छिपाबड पोलिसांनी अटक केली होती. पोलीस तपासात निष्पन्न झालेल्या माहितीच्या आधारे पुन्हा खंडवा येथील रहिवासी असलेले आरोपी हुसेन मोहंमद मुबारक व खालिद मोहंमद आझाद यांना खंडवा जिल्ह्यातील छैगाव माखन येथून हरदा पोलीस दलाने अटक केली आहे. छिपाबड पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील वरील चौघाही आरोपींनी १०० व २०० रूपयांच्या बोगस नोटा रावेर येथील आरोपी शेख शाकीर शेख हाफिज (वय १९) याच्याकडून घेतल्याचे स्पष्ट केले आहे. किंबहुना, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रवीकुमार शर्मा यांनी शनिवारी रावेर शहरातील पाँच बिवी चौकात रावेर पोलिसांच्या मदतीने सापळा लावून आरोपी शेख शाकीर शेख हाफिज यास घरात झडप घालून अटक केली होती.
यांना केली अटक...
सदर मास्टरमाईंड आरोपीला मध्यप्रदेश पोलिसांनी अटक करताच रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी स्वतः व सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे तथा गुन्हा शोध शाखेतील यंग ब्रिगेडद्वारे रावेर शहरात शोध मोहीम राबवून रविवारी सात ते आठ संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी करत बोगस व नकली चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करत आरोपी असलम उर्फ राजू सुपडू तडवी (वय ३० रा. पाँच बिवी चौक, रावेर), सोनू मदन हरदे( वय ३०, अफुगल्ली, रावेर) रवींद्र राजाराम प्रजापती (वय ३१, रा. कुंभार वाडा, रावेर), शेख शाकीर शेख साबीर (वय २६ रा. खाटीक वाडा, रावेर) व शेख शाकीर शेख हाफिज ( मध्यप्रदेश पोलिसांच्या अटकेतील आरोपी ) यांना अटक केली आहे.
मास्टरमाईंड असलेल्या म. प्र. पोलिसांच्या अटकेतील आरोपी शेख शाकीर शेख हाफिज याच्याकडून १०० व २०० च्या नकली नोटांची सात हजाराची रक्कम त्यांच्या अंगझडतीतून जप्त करण्यात आल्याची माहिती रावेर पोलीस सूत्रांनी दिली असून, तत्पूर्वी रावेर शहरात व परिसरात किती रकमेचे नकली चलन चलनात आले असेल? याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. मध्य प्रदेश पोलिसांच्या पाठोपाठ रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी स्वतः सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मेढे, सुकेश तडवी, मंदार पाटील, सचिन घुगे, हर्षल पाटील, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, कुणाल सोनवणे यांच्या पथकाने बोगस चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, पोकॉ सचिन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम ४८९, ४८९ (ब), ४८९ (क) व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत.
मास्टरमाइंड शाकीर शेख हाफिजचा गॉडफादर कोण? मध्यप्रदेशातील इंदूर एटीएस व भोपाळ एसटीएफ सह हरदा पोलीस व रावेर पोलिसांच्या रडारवर असलेला आरोपी शेख शाकीर शेख हाफिज याने १०० व २०० च्या नकली नोटांचे जाळे मध्यप्रदेशासह रावेर शहर तथा जिल्ह्यातही पसरविल्याची शक्यता नाकारता येत नसली तरी अखेर शेख शाकीर शेख हाफिज या १९ वर्षीष मास्टरमाईंडचा गॉडफादर अखेर आहे कोण? त्याने या नकली नोटा कोणाकडून आणल्या? त्याचे रॅकेट आणखी कुठे कुठे पसरले आहे? नकली नोटांचा छापखाना अखेर कुठे आहे? या बाबींचा पर्दाफाश करण्यात रावेर पोलिसांसह मध्य प्रदेश पोलिसांसमोर मोठे आव्हान असून या गुन्ह्याची एक-न्-एक कडी उलगडण्याची गरज आहे.