बनावट आधारकार्ड, पॅनकार्डचा वापर करून लोकांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:31+5:302021-06-24T04:12:31+5:30
जळगाव : स्टेट बँक लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला एजंट कोड व म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लोकांना ...
जळगाव : स्टेट बँक लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला एजंट कोड व म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लोकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या विकास सुरिंदर कपूर (रा.साध नगर, पालम गाव, दिल्ली) याने हे काम करताना रस्त्यावर हिंडणारे, भिकारी तसेच मजुरांच्या नावाने बनावट आधार व पॅनकार्ड तयार करुन त्यांच्या नावाने बँकेत खाते उघडले व पैसे वळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी दिल्लीतून कपूर याच्या घरझडतीत गुन्ह्यात वापरलेले दोन लॅपटॉप, हार्डडिस्क जप्त केले तसेच सचिन राम गुप्ता (वय ३२, रा.भजनपुरा, उत्तर-पूर्व दिल्ली) या त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. हे पथक अजूनही दिल्लीत तळ ठोकून आहे.
विकास कपूर व त्याच्या सहकाऱ्यांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून वामन काशिराम महाजन (रा.अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) या शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला होता. सायबर पोलिसांनी गेल्या आठवड्यात त्याच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक संदीप पाटील, दिलीप चिंचोले, नितीन सपकाळे, गौरव पाटील, दिनेश पाटील व वसीम शेख यांचे पथक दिल्लीत दाखल झाले आहे. दोन पथकात त्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागणी करण्यात आली आहे. हिरे यांच्या पथकाने मुख्य आरोपी विकास कपूर याची घरझडती घेऊन लॅपटॉप जप्त केले.
गच्चीवरुन पळून जाताना पकडले
विकास कपूर याला अटक झाल्यामुळे इतर साथीदार सावध झाले होते. जळगाव पोलीस घरी पोहोचल्याचे समजताच वरच्या मजल्यावर असलेला सचिन गुप्ता गच्चीवर पळाला. उपनिरीक्षक संदीप पाटील, दिलीप चिंचोले व नितीन सपकाळे यांनी गच्ची गाठली. तेथून पलायन करण्याच्या तयारीत असताना तिघांनी त्याला घेरुन ताब्यात घेतले. काही सेकंद विलंब झाला असता तर गुप्ता हाती लागला नसता.
हरियाणात ९६ लाखांचा गंडा
कपूर टोळीने जळगावप्रमाणेच हरियाणातही एका व्यक्तीला अशाच पद्धतीचे आमिष दाखवून ९७ लाखांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. वामन महाजन यांच्याशी संपर्क साधून त्याने तुमच्या विम्याचे व्याज एजंटला मिळत आहे, तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला मिळवून देतो असे सांगून जाळ्यात ओढले.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही ३० हजार भरले
आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर महाजन यांनी कपूर याच्या खात्यावर ३० हजार रुपये भरले. तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील, असे सांगून व्हॉट्सॲपवर महाजन यांच्या नावाने तयार केलेले धनादेश पाठविले. त्यासाठी आरटीजीएस व इतर प्रोसेसिंगसाठी ३० हजार रुपये पाठवावे लागतील असे कपूर याने महाजन यांना सांगितले. आता खरंच पैसे मिळतील या आशेने त्यांनी पुन्हा पैसे पाठविले. ३० हजार रुपये गेले पण तेथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तंत्रज्ञानाचा वापर करुन त्याची कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली.
कोट...
एक संशयित हाती लागला आहे. त्याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेले लॅपटॉप व बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे. यात आणखी काही लोकांचा सहभाग आहे. त्याची चौकशी व तपास सुरु आहे. हे मोठे रॅकेट असून या गुन्हेगारांनी भारतभर असे गुन्हे केलेले आहेत.
-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे