म्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी येथे शिष्यवृत्ती, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच या वेळी प्राथमिक शिक्षक हिंमत देवरे लिखित 'वक्ता तू होशीलच' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री देवरे होत्या. दीपप्रज्वालन प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, डीडीसी बँक संचालक हर्षवर्धन दहिते, साक्री पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे, प्रदीप नांद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. म्हसदी येथील भूमिपुत्र कन्नड येथील प्राथमिक शिक्षक हिंमत शिवाजी देवरे यांचे स्वयंलिखित ६ वे 'वक्ता तू होशीलच' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती, बारावी कला, विज्ञान शाखेच्या प्रथम येणार्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नोकरीनिमित्त कॅनडा, अमेरिका, दुबई आदी ठिकाणी जाणार्या गावातील काही विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.मोहन देसले यांनी गावातील तरुण वर्ग एवढा शैक्षणिक विकासात भरारी घेतो, याचे कौतुक करावेसे वाटते. लेखक, संगीत, वाद्य, पोहणे, नाचणे ही एक कला आहे. ती सर्वांना अवगत नाही. म्हणून एका खेडेगावातही हिंमत देवरेंसारखा प्राथमिक शिक्षक लेखनातून ६ पुस्तके प्रकाशित करू शकतो ही मात्र, अभिमानाची गोष्ट आहे, असे मनोगत व्यक्त केले.
म्हसदीत गुणगौरव आणि पुस्तक प्रकाशन
By admin | Published: June 02, 2015 4:51 PM