खेडगावात गावकीचा 'सेतु, जोडणा-या एका माकडाची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:50 PM2018-03-30T17:50:21+5:302018-03-30T17:55:16+5:30
श्रध्दा अन् भक्तीची शक्ती : रामाच्या वानरसेनेतील 'वारसाची’ मृत्यूनंतर घडली अशीही सेवा
संजय हिरे / आॅनलाईन लोकमत
खेडगाव, ता.भडगाव, दि.३० : मर्यादा पुरुषोत्तम राम अन् वानरसेनेच्या कथा रामायणात आदर्श बणून राहिल्या आहेत. रावणाच्या लंकेत प्रवेश करतेवेळी सागरात वानरसेनेने रामभक्त हनुमानाच्या जोडीने रामसेतू बांधल्याचे वर्णन आहे. असाच गावकीचा सेतू जोडला जात असल्याचा योग खेडगाव येथे एका वानरराजाच्या मृत्यूच्या निमित्ताने घडुन आला आहे. आजच्या हनुमान जयंत्तीच्या मुहूर्तावर हा श्रध्दा अन् भक्तीचा पार पडणारा सोहळा म्हणुनच विशेष आहे.
एक होते माकड. जंगलात पोटापाण्याचे भागेना. म्हणुनच गोष्टीतील आटपाट नगर असलेल्या खेडगावच्या दिशेने ते आपल्या सहकारी वानरांसह अन्नाच्या शोधार्थ निघाले. वाटेत विज तारांच्या रुपात असलेल्या मृत्युच्या पसरलेल्या जाळ्यांचे त्याला भानच राहीले नाही. आपल्यासाठी उड्या मारण्यासाठी झुलाच असल्याचा समजातून त्याने थेट त्यावर उडी घेतली अन् क्षणार्धात ते जमिनीवर निपचीत पडले. सहकारी वानरांनी त्याचे भोवती वेटोळे करीत जणुकाही शोकच प्रकट केला.
मृत वानराच्या अंतिम सेवेसाठी जात-पात, आपआपसातील वितुष्ठ विसरुन गाव एक झाले. आपल्याच कुटुंबातील सदस्य गेल्याची भावनेतून गाव मिळून, अंत्यविधी, दुध चढवण्याचा कार्यक्रम, तीन दिवस ग्रामस्थांनी तर दहा दिवस आग्या-खांद्यानी सुतक धरले. आया-बहीणीनी कपाळीचे कुंकू काढले. शुक्रवार ३० रोजी अर्ध्या गावाने केशदान केले. ग्रामस्थांनी ८० हजारावर रक्कम पुढील क्रियाकर्मासाठी संकलित केली. १४ हजाराची वानरराजाची मूर्ती खुलताबाद येथून घडवली. कुणी तांदुळ, कुणी दाळ, कुणी साखर असा उत्तरकायार्चा खर्च पेलला. गावाच्या हमरस्त्यावरील शिवाजीनगरात चौथरा उभारण्यात आला. शनिवार ३१ रोजी हनुमान जयंती. दोनच दिवसापूर्वी रामनवमी साजरी झाली. रामभक्त हनुमान, अंगद शिष्ठाई रामायणात ऐकलीत. हीच भक्तीची शक्ती खेडगाव अनुभवतेय.
काळ दोन वर्षापूर्वीचा, गावी पंचायत निवडणुक लागली. काही विघ्नसंतोषी शक्तीनी गावातील समाजासमाजात फुट पाडली. निवडणुका झाल्यात मात्र मतभेद कायम राहिले. एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होणा-यांचे चार दिशेला चार तोंडे कायम राहीलेत. एवढेच नव्हे तर गावातील हभप भजनी मंडळात उभी फुट पडली. रामाचा दूत म्हणुन आलेल्या वानराच्या मृत्युनंतर हळुहळु चित्र बदलतेय. राम नावाने सागरात दगड तरलेत रामसेतू उभारला गेला. गावकीचा सेतू जोडला जाण्याची शक्ती नक्कीच गावाच्या श्रध्देत, भक्तीत आहे. आपआपसातील वितुष्ठाचा लोप होण्याची ताकद यात आहे. तसा अनुभव येतोय. विज्ञान वादी विचारसरणीच्या नागरिकांना ही अंधश्रध्दा वाटतेय. तर गावाला जोडणारी ही श्रध्दा-भक्ती म्हणुन भाविक मन याकडे आशेने पहात, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान..! चा नारा लावत नक्कीच समाधानी पावतोय.!