जळगाव : ऐन दिवाळीत शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे तर दुसरीकडे सणासुदीतच झोपडपट्टी भागातील स्वस्त धान्य दुकानांवरून हरभरा डाळ, तूरडाळ, साखर गरजूंना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.२५ ते ३० टक्के सिलिंडरचा तुटवडागेल्या दोन दिवसांपासून एका कंपनीचे सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने त्याच्या झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत. जळगावातील गॅस रिफलिंग प्रकल्पात मुंबई येथून गॅसचे टँकर गॅस घेऊन येतात. मात्र गेल्या दोन -तीन दिवसांपासून टँकरमध्ये अनियमितता असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सिलिंडर भरण्यास अडचणी येत आहेत. शहरात दररोज ४ ते ५ हजार सिलिंडरची मागणी असते. त्यातील जवळपास २५ ते ३० टक्के ग्राहकांना गॅस सिलिंडर कमी पडत असल्याची माहिती मिळाली.गॅस सिलिंडर बुक केल्यानंतरही सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. दिवाळीसणामध्ये घरोघरी पाहुण्यांची ये-जा असते, सिलिंडर मिळत नसताना काय करावे, असा सवाल काही ग्राहक उपस्थित करीत आहेत. दरवर्षी दिवाळीच्या काळात अशी समस्या उद्भवते, असेही जाणकारांनी सांगितले.दरम्यान, या संदर्भात कंपनीचे विक्री अधिकारी (सेल्स आॅफिसर) नीलेश लठ्ठे यांनी सांगितले की, ही किरकोळ समस्या असून दोन-तीन दिवसात ती मार्गी लागेल.स्वस्त धान्य उपलब्ध करुन द्यासिलिंडरपाठोपाठ शहरात दुसरी समस्या उद््भवली आहे ती स्वस्त धान्याची. अनेकांना स्वस्त धान्य मिळत नसल्याची तक्रार आल्याने अल्पसंख्यांक सेवा संघाच्यावतीने शनिवारी शाहूनगर, गेंदालाल मिल परिसर, हुडको, शिवाजीनगर, तांबापुरा इत्यादी भागांसह कानळदा, आव्हाणे येथे सर्वेक्षण केले. त्यात स्वस्त धान्य दुकानांवर संघाच्या कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता तांदूळ उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थींकडे विचारणा केली असता साखर, हरभरा डाळ, तूर डाळ मिळालीच नसल्याचे सांगण्यात आले. २२ ते २३ दुकानांची पाहणी केली. त्यातील बहुतांश दुकाना बंद असल्याचे आढळून आले.दुकानांवर लाभार्थ्यांच्या नावाने आलेला माल त्यांना मिळाला नाही व दुसरीकडे दुकानातही उपलब्ध नाही, मग हे धान्य गेले कोठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संघाचे प्रदेशाध्यक्ष जहांगिर खान, जिल्हा महिलाध्यक्षा आयेशा मणियार, जिल्हाध्यक्ष याकूब खान,मनिषा जगदाळे, गुलामबेग, सय्यद याकूब अली, यास्मीन बी यांनी सर्वेक्षण केले.स्वस्त धान्य दुकानदारांना दिवाळीसाठीचा साठा वितरीत करण्यात आला असून जळगाव तालुक्यातील थोडीफार दुकाने राहिली होती. उद्यापर्यंत सर्वांना साठा उपलब्ध होईल. स्वस्त धान्यापासून कोणीही वंचित राहणार नाही.- राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी.
जळगावात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यासह स्वस्त धान्यापासून सामान्य वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 12:31 PM
ऐन सणासुदीत दुहेरी संकट
ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानांवरून डाळी, साखर गायब