पैलतीरावर जाण्यासाठी घ्यावा लागतो होडीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:59 PM2021-01-10T16:59:39+5:302021-01-10T16:59:47+5:30
गिरणा नदीवर पूल म नसल्याने जनतेचे हाल होतात.
प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल : पाचोरा व एरंडोल तालुक्यातील गावांना येण्या-जाण्यासाठी माहेजी या गावाजवळ गिरण्या नदी पात्रातून पाण्यातून जावे लागते. येथे नदी खोल असल्याने पैलतीरावर जाण्यासाठी होडीच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे. अन्यथा पाचोरा अथवा म्हसावद मार्गे जास्तीचे अंतर कापून जावे लागते. ही मोठी अडचण लक्षात घेऊन येथे पूल उभारावा, अशी मागणी या दोन्ही तालुक्यांतील जनतेतून होत आहे.
पाचोरा तालुक्यातील माहीजी, वरसाडे,द हिगाव, नांद्रे, लासगाव, सामनेर, बामरुड, मोहाडी, जवखेडा, वडली, दोणगाव, पहाण, पाथरीसह सुमारे ५० गावातील लाखो लोकांना एरंडोल तालुक्यात अथवा पारोळा, धुळे जाण्यासाठी माहिजी नदी ओलांडून अगदी जवळचा हाच मार्ग आहे. परंतु नदीत पाणी असल्याने मोठी वाहने म्हसावद अथवा पाचोराकडून जास्तीचे अंतर कापून जावे लागते. तसेच एरंडोल तालुक्यातील बाम्हणे, हणूमंतखेडे, भातखेडा, उत्राण, ताडे, निपाणे, जवखेडा, गालापूर अंतूर्ली, तळई, कासोदा, नांदखुर्दे, वनकोठा, फरकांडे,उ मरे, पिंपरखेड, आडगाव, मालखेडा, धुळपिंप्री, मंगरुळ यासह शेकडो गावातील जनतेला पाचोरा किंवा म्हसावद मार्गेच जावे लागते. यात इंधन व वेळ वाया जातो. जर का माहिजी गावाजवळ गिरणा नदीवर चांगला पूल बांधला गेला, तर या दोन्ही तालुक्यातील जनतेला खूप मोठा फायदा होणार आहे. एरंडोल व पाचोरा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी याकामी लक्ष देऊन ही जुनी मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
योगायोग
पाचोरा व एरंडोल तालुक्यांतील लोकप्रतिनिधी एकाच पक्षाचे आहेत. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील व एरंडोल-पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे दोन्ही शिवसेना पक्षाचे असून सत्तेतील प्रतिनिधी आहेत. या दोघांच्या मतदारसंघातील जनतेची ही अनेक दशकांची मागणी या दोघांच्या कालावधीत व्हावी, अशी अपेक्षा या सुमारे शंभरावर गावातील जनतेची आहे. या दोन्ही आमदारांनी समन्वयातून या मागणीसाठी सरकारचे या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष वेधावे, अशी मागणी अपेक्षा व्यक्त होत आहे.