आयपीएल बुकी प्रकरणातील घनश्याम अग्रवाल यांचे भाजपाच्या फलकावर छायाचित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:00 PM2018-05-08T12:00:41+5:302018-05-08T12:00:41+5:30
चोपड्यात रंगतेय चर्चा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ८ - आयपीएल बुकी प्रकरणात घनश्याम ओंकार अग्रवाल यांचा भाजपाशी संबंध नसल्याचा दावा भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला असला तरी भाजपाच्या फलकावर घनश्याम अग्रवाल हे भाजपाचे नेते असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शहराध्यक्षांचा दावा या फलकाने फोल ठरविला आहे.
चोपडा येथील भाजपाचे नेते घनश्याम अग्रवाल यांना आयपीएल बुकी प्रकरणात रायगडातील खालापूर पोलिसांनी कारवाई करताच भाजपाची बदनामी टाळण्यासाठी शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी तातडीने पत्रकार परिषद घेतली होती. घनश्याम अग्रवाल भाजपाचा कोणताही सदस्य नाही व पदाधिकारीदेखील नाही. त्यांची ११ वर्षांपूर्वी भाजपमधून हकालपट्टी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र शहरात नुकत्याच झालेल्या अपंग शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर फलक लावण्यात आले होते, त्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. त्यावर अग्रवाल यांचेही छायाचित्र असून नेते म्हणून त्यावर उल्लेख केलेला आहे.
विशेष म्हणजे भारत सरकारचा शासकीय लोगोही त्या बॅनरवर लावण्यात आला आहे. इतक्या दिवसांपासून अग्रवाल हे तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यीतील मोठ्या दिग्गज नेत्यांना ते भाजपा नेते म्हणून चालत होते.
अचानक आयपीएलसाठी सट्टा बुकी म्हणून अग्रवाल यांना खालापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपाच्या शहर प्रमुख नरेंद्र पाटील यांना घनश्याम अग्रवाल हे भाजपाचे नसल्याचे कसे सुचले? तर भाजपाच्या अंगाशी येऊ नये म्हणून भाजपाने कांगावा केला असल्याची चर्चा आहे.
फलकाच्या खाली भाजपा युवा पार्टीचे सागर पठार, भाजपा शहर उपाध्यक्षा अलका प्रवीण पाटील, चोसाकाचे व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, सूतगिरणीचे संचालक शशिकांत पाटील यांचीही नावासह छायाचित्रे आहेत. या फलकांची दिवसभर चर्चा होत होती.