भोंग-या बाजारातून मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:15 PM2018-03-10T17:15:57+5:302018-03-10T17:15:57+5:30
चोपडा तालुक्यातील अडावद येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या भोंग-या बाजारातून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोकमत आॅनलाईन
अडावद ता. चोपडा: अडावद ता.चोपडा : लग्नाचे आमिष दाखवून १२ वर्षीय मुलीस येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या भोंग-या बाजारातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुलीच्या पित्याने अडावद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून एका युवकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, अधिक माहिती अशी की, आदिवासी बांधवासाठी भोंग-या बाजाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या महिन्यातील सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी अडावद येथे भोंग-या बाजार भरलेला होता. या ठिकाणी महाराष्ट्रासह जवळच्या मध्यप्रदेशातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. यात बडवानी जिल्ह्यातील आमझिरी गुमड्या येथील व सध्या पाळधी ता.धरणगाव येथे राहत असलेल्या आदिवासी कुटूंबाने देखील अडावद येथील भोंग-यात हजेरी लावली होती.
या भोंग-या बाजारातून त्या दिवशी दुपारी १ वाजेच्या सुमारास पाळधी येथे राहत असलेल्या आरोपी संजय नारायण बारेला या युवकाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवित फूस लावून पळवून नेले.
याबाबत पिडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संजय बारेला याच्याविरुध्द भाग ५ गु.र.नं. १३/१८ भादंवि कलम ३६३, ३६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गजानन राठोड हे करीत आहेत.