नवसाला पावणारी जळगावच्या भवानी पेठेतील ‘भवानी’ देवी

By अमित महाबळ | Published: September 27, 2022 03:12 PM2022-09-27T15:12:25+5:302022-09-27T15:16:05+5:30

पूर्वी भवानी मातेचे मंदिर गावाच्या बाहेर असल्याचे म्हटले जायचे. त्यावेळी ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान आणि त्यामागील मारुती मंदिर ही जुन्या जळगावची गावाची हद्द होती.

Goddess Bhavani of Jalgaon's Bhavani Peth | नवसाला पावणारी जळगावच्या भवानी पेठेतील ‘भवानी’ देवी

नवसाला पावणारी जळगावच्या भवानी पेठेतील ‘भवानी’ देवी

googlenewsNext

जळगाव : भवानी पेठेतील भवानी माता नवसाला पावणारी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, लांबवरून अनेक भक्तगण दर्शनासाठी येत असतात. नवसपूर्तीनंतर पापड्या, सांजोऱ्या, केळी, जिलेबी यांचे फुलोरे देवीला अर्पण केले जातात. नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम मंदिरात होत असतात.

पूर्वी भवानी मातेचे मंदिर गावाच्या बाहेर असल्याचे म्हटले जायचे. त्यावेळी ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान आणि त्यामागील मारुती मंदिर ही जुन्या जळगावची गावाची हद्द होती. त्यापुढे जंगल होते. कालांतराने जंगल नाहिसे होऊन रहिवासी वस्ती वाढत गेली. विस्तारीत भागाला भवानी पेठ यासह सराफ बाजार म्हणून नवीन ओळख मिळाली. भवानी मातेच्या मंदिराचा उल्लेख जळगाव जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये देखील केलेला आहे. भवानी देवीचे मूळ मंदिर केव्हा बांधले गेले याचा उल्लेख कुठे मिळत नाही. 

मुंबईत महालक्ष्मी आहे, जळगावमध्येही असावी -
१९२४ मध्ये भाविकांच्या सहकार्यातून जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या परिसरात शहराची मुख्य बाजारपेठ होती, आजही आहे. व्यापारी व्यवहारानिमित्त मुंबईला जायचे. त्यांची महालक्ष्मीवर अगाध श्रद्धा होती. मुंबईप्रमाणे आपल्याकडेही महालक्ष्मीचे मंदिर असावे या भावनेतूने त्यांनी श्रद्धापूर्वक महालक्ष्मीची (गजलक्ष्मी) भवानी मंदिरात स्थापना केली. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला छोटे हत्ती आहेत. मंदिरात भवानी देवीशिवाय महादेवाची पिंड व मारुतीच्या मूर्ती आहेत.

खिळ्याचा वापर नाही, सागवानी लाकडात काम -
मंदिर दगडी चौथऱ्यावर सागवानी लाकडात उभारलेले आहे. या कामात खिळ्याचा वापर केलेला नाही. खाचा करून त्यामध्ये लाकूड घट्ट बसवले आहे. इतक्या वर्षानंतरही हे काम टिकून आहे. मंदिराच्या खाली तळघर आहे. जपानमध्ये तयार झालेल्या मोझाइक टाइल्स बसवलेल्या आहेत. तसेच बेल्जिअमहून आणण्यात आलेला मोठा आरसा गर्भगृहाच्या समोर भिंतीवर लावलेला आहे. भाविकांची गर्दी वाढत गेल्यानंतर मंदिराचा विस्तार झाला. सभामंडप उभा राहिला. सभा मंडपाच्या मुख्य दरवाजासमोर हवनकुंड आहे. मंदिरात काकडा, आरती, श्रीसूक्त पठण व इतर धार्मिक विधी होत असतात. नवरात्रोत्सवात भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होते. अष्टमीला नवचंडी पाठ व हवन असते. दसऱ्याला समारोप होतो.

यात्रोत्सवाला जुनी परंपरा -
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराजवळील सुभाष चौक परिसरात यात्रोत्सव भरतो. खेळणी, खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या वस्तू यांची दुकाने लागतात. यात्रोत्सवात जळगावकरांची खरेदीसाठी गर्दी होते. यात्रेला १३० ते १३५ वर्षांची परंपरा आहे.
 

Web Title: Goddess Bhavani of Jalgaon's Bhavani Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.