आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१९ : डॉलरच्या तुलनेत रुपयांचे दर कमी जास्त होत असल्याने सोने-चांदीतही अस्थिरता निर्माण झाली असून त्यांचे भाव सातत्याने कमी जास्त होत आहे. चांदीला मागणी नसताना आठवडाभरात चांदीचे भाव एक हजार रुपये प्रति किलोने वाढले आहेत.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. यामध्ये भारत-पाक संबंध असो अथवा कोरिया क्षेपणास्त्रांची कारवाई असो, यामुळे सोन्या-चांदीवर परिणाम झाल्याचे दिसून येते. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर बाजाराचा परिणाम होण्यासह डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे दर कमी जास्त होत असल्याने त्याचा सोने-चांदीवर परिणाम होत आहे.फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुपयांचे दर बदलत आहे. सध्या एका डॉलरचा दर कधी ६४ रुपये तर ६३ तर कधी त्यापेक्षा वाढत आहे. यामुळे सोने-चांदीही अस्थिर झाले आहे. १ फेब्रुवारी रोजी ३० हजार ७०० रुपये प्रति तोळा असलेले सोने एकाच दिवसात ४०० रुपयांनी वाढून २ रोजी ३१ हजार १०० रुपयांवर गेले. त्यानंतर कमी कमी होत जाऊन ८ रोजी ३० हजार ४०० रुपयांवर खाली आले. आता १६ रोजी ३१ हजार ३०० रुपये भाव होऊन १७ रोजी पुन्हा ३१ हजार २०० रुपयांवर खाली आहे.सततच्या या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून बाजारात परिणाम जाणवत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सर्वत्र कच्च्या तेलाचाही सर्वत्र मोठा परिणाम होत असून सोने-चांदीवरही तो जाणवत असल्याचे जाणकारांनी सांगितले.सोन्यावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून हा कर ३ टक्के झाल्याने भार वाढल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. एक किलो सोने खरेदी केले तरी त्यासाठी हजारो रुपये कर मोजावा लागत आहे. मात्र सोने विकायला गेले तर याचा कोणताही फायदा होत नाही, यामुळे सोने खरेदीत काटकसर केली जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.सततच्या भावातील चढ-उतारामुळे विक्रीवर परिणाम होत असला तरी सध्या लग्न सराईसाठी सोने-चांदीची खरेदी केली जात आहे. लग्नसराईचा आधार असल्याचेही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.सध्या चांदीला मागणी नसली तरी आठवडाभरात एक हजार रुपये प्रतिकिलोने भाव वाढले आहे. ९ फेब्रुवारी ४० हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी १७ रोजी ४१ हजार रुपये प्रति किलो झाली आहे. दोन दिवसांपूर्वी १५ रोजी तर चांदी ४१ हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. मागणी नसली तरी भाव वाढण्यास रुपयाचे दर कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले.
रुपयाच्या अस्थिरतेने जळगाव सराफ बाजारात सोने-चांदी भावात चढ-उतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:42 PM
सोन्याला मागणी कायम तर आठवडाभरात चांदी हजार रुपयांनी वाढली
ठळक मुद्देमागणी नसतांना चांदीच्या भावात हजार रुपयांनी वाढलग्न सराईमुळे सोने व चांदीच्या दागिन्यांना वाढली मागणीजीएसटीमुळे सोने खरेदीत काटकसर सुरु