भडगाव येथे शासनाने भरडधान्य खरेदीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:47+5:302021-06-04T04:13:47+5:30
यावर्षी रब्बी हंगामात मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे गहू, ज्वारी, मका आदी पिकांची चांगली आकारणी झाली. शासनाकडून चांगला भाव मिळेल. शासन ...
यावर्षी रब्बी हंगामात मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे गहू, ज्वारी, मका आदी पिकांची चांगली आकारणी झाली. शासनाकडून चांगला भाव मिळेल. शासन शेतकऱ्यांचे भरडधान्य खरेदी करेल या आशेने शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, मका आदी पिकांची महिनाभरा पूर्वीपासून ऑनलाइन करणे सुरूच ठेवले होते. शासनाने ज्वारीचा प्रति क्विंटल दर २,६२० रुपये जाहीर केला आहे. मका शासकीय भाव प्रति क्विंटल १८५० रुपये इतका जाहीर करण्यात आला आहे. गव्हाचा शासकीय भाव प्रति क्विंटल १,९७५ रुपये भाव जाहीर केला आहे. ज्वारी धान्याची एकूण १०६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
मका धान्याची एकूण ५६० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे? तर मका धान्याची एकूण १२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. भरडधान्य नोंदणी झाली आहे. पणन रब्बी हंगाम २०२०-२१ या वर्षासाठीचे भरडधान्य खरेदीचे परिपत्रकानुसार ऑनलाइन नोंदणी झाली आहे. मात्र अद्यापही शासनाकडून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे पत्र प्राप्त झालेली नाही, अशी माहिती भडगाव शेतकरी संघाचे सचिव अवधूत देशमुख यांनी दिली.
हंगाम संपल्यात जमा आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या भरडधान्य खरेदीची वाट पाहत अखेर खासगी व्यापाऱ्याना ज्वारी, गहू, मका धान्य कमी भावात विकण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना धान्य माल मोजून दिला तर काही शेतकऱ्यांचा धान्य माल अद्यापही पडून आहे. तिथं गेली अन् भिंत पूजा, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. अद्यापही नोंदणी केलेले शेतकरी शासनाने भरडधान्य केंद्र सुरू करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भरडधान्य मोजणीला शासनाकडून दिरंगाई का होत आहे? असा संतप्त प्रश्न शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.
पावसाळा तोंड्यावर आला आहे. खरीप हंगामाच्या पीक पेरण्या तोंडावर आल्यागत आहेत. बहुतांश शेतकरी ज्वारी, गहू, मका आदी धान्य घरातच राखून आहेत. शेती मालच विकला नाही तर खरिपाच्या पीक पेरणीला बी-बियाणे, रासायनिक खते आदी खर्च करावा तरी कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
भडगावात ७७६ शेतकऱ्यांनी मोजला ८६९० क्विंटल हरभरा
तालुक्यात शासनाकडून हरभरा नाव नोंदणी करणारे शेतकरी संख्या ९३९ इतकी होती. दि.१५ फेब्रुवारीपासून ते दि. २४ मे २०२१ पर्यंत एकूण ८६९० क्विंटल खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती भडगाव शेतकरी सहकारी संघाचे सचिव अवधूत देशमुख यांनी दिली.