रावेर बीएसएनएलचे वीज संयोजन खंडित झाल्याने शासकीय कार्यालय व बँकींग आॅनलाईन व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:36 PM2019-08-04T14:36:00+5:302019-08-04T14:36:46+5:30
रावेर तालुक्यातील बँकांसह तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, ग्रामीण रूग्णालय, कृषी विभाग, आरोग्य केंद्र, बसस्थानक, महावितरण कार्यालयाची संपर्क यंत्रणा व ब्रॉडबँड इंटरनेट सेवा कोलमडली
रावेर, जि.जळगाव : भारत संचार निगमच्या रावेर उपविभागीय कार्यालयासह नऊ ग्रामीण स्वयंचलित दूरध्वनी केंद्रांची डिसेंबर २०१८ व मार्च २०१९ पासून सुमारे १६ लाख ५० हजारांची वीज बिलांची रक्कम थकल्याने महावितरणने भारत संचार निगमच्या रावेर उपविभागीय अभियंता कार्यालयासह ग्रामीण नऊ स्वयंचलीत दूरध्वनी केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कठोर कारवाई शुक्रवारी केली. परिणामी रावेर शहरातील महत्त्वाच्या पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील, पंचायत समिती, पालिका, ग्रामीण रूग्णालय, महावितरण उपविभागीय कार्यालय, रावेर बसस्थानक, शहरासह ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकृत बँका व आरोग्य केंद्रांची, ग्रामपंचायत व महसूल तलाठी सजांची संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. ब्रॉडबँड इंटरनेट सेवाही खंडित झाल्याने आॅनलाईन सेवेची यंत्रणा ठप्प होवून जनसामान्यांचे कमालीचे हाल होत आहेत.
भारत संचार निगमच्या रावेर उपविभागीय अभियंता कार्यालयाचे माहे डिसेंबर २०१८ पासून तर ग्रामीण भागातील खानापूर, वाघोड, खिर्डी, खिरोदा आदी नऊ स्वयंचलित दूरध्वनी केंद्रांचा मार्च २०१९ पासून सुमारे १६.५ लाख रुपयांची वीज बील थकबाकी थकली आहे. यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले आहे.
महावितरणच्या या कठोर कारवाईमुळे भारत संचार निगमला सोयरसुतक नसले तरी तालुक्यातील पोलीस, महसूल, दुय्यम निबंधक, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, कृषी, वीज, बसस्थानक व राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी संस्थांची संपर्क यंत्रणा व ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पूर्णत: कोलमडून पडली आहे. परिणामी शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह बँकींग व्यवहार ठप्प झाले आहे. जनजीवन कमालीचे प्रभावित झाले असून, जनसामान्यांचे कमालीचे हाल होत आहेत.