लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शासनातर्फे रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करून महिना उलटला तरी खरेदी सुरू न झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे तर काहींना कमी भावात खुल्या बाजारत धान्य विक्री करावे लागत असल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत.
राज्य शासनाने भरड धान्य खरेदी योजनेत ज्वारी, मका ,गहु खरेदी योजना सुरू करून १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नावे नोंदणी सुरू केली होती. नावे नोंदणीस मुदत वाढ मिळणार नाही, असे सक्त ताकीदीचे पत्र ही जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी दिले होते. शासनाने हायब्रीड ज्वारीसाठी २६२० रुपये, माल दांडी ज्वारी साठी २६४० रुपये, मका १८५० रुपये, गहू १९७५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. अमळनेर तालुक्यात ५८९ शेतकऱ्यांनी मका साठी नोंदणी तर १०७६ शेतकऱयांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत संपून २५ दिवस उलटले तरी शासनाने खरेदी सुरू झाली नाही. योग्य भाव मिळेल नोंदणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल घरात साठवून ठेवला आहे. दरम्यानच्या काळात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी तथा शेती मशागत, बी बियाणे खरेदीसाठी पैसे लागणार असल्याने काही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात आपला माल विक्री सुरू केला असून व्यापारी या संधीचा फायदा घेत मका फक्त १४०० रुपये क्विंटल तर ज्वारी निम्मे भावाने म्हणजे १३०० रुपये क्विंटल भावाने खरेदी करत आहेत.
शासनाची भरड धान्य योजना फसवी असून शेतकऱ्यांना निम्मे भावात ज्वारी विकावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
-स्मिता वाघ, माजी आमदार, भाजप
रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी यंत्रणा तयार आहे. गोदाम उपलब्ध असून २० हजार क्विंटल धान्य खरेदी करण्याची क्षमता असून ज्वारी मका नोंदणी झाली आहे. गहूची नोंदणी झाली नाही. वरिष्ठांचे आदेश येताच खरेदी सुरू होईल.
-संजय पाटील, व्यवस्थापक शेतकी संघ, अमळनेर
ज्वारी मका इत्यादी रब्बी पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासंदर्भात शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा सर्व माल शेतकऱ्याकडे पडून आहे. पावसाळा जवळ आल्याने त्यात अळ्या, किडे पडून खराब होईल. तसेच खरीप हंगामात शेतकरीवर्गाला आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर शासनाने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-धनंजय एकनाथ पाटील, शेतकरी , दहिवद, ता. अमळनेर.