ग्रा.पं. निवडणुकीत विजयासाठी महिलांनी खोचला पदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:13+5:302021-01-10T04:13:13+5:30
तालुक्यात ६१९ महिला उमेदवार निवडणुकीला उभ्या लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यात ६१९ ...
तालुक्यात ६१९ महिला उमेदवार निवडणुकीला उभ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यात ६१९ महिला उमेदवार उभ्या आहेत. एकूण उमेदवारांची संख्या ... इतकी आहे. तर त्यात एका तृतीयपंथी उमेदवाराचाही समावेश आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत महिलांनी पदर खोचून विजयासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून येण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. भावकीचे वाद, गावातील बांधाचे वाद सांभाळून घेत ही निवडणूक होते. आता कायद्यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ५० टक्के आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी महिलांना जास्त वाव मिळतो. बहुतेक गावपुढारी आपल्या घरातूनच पत्नी, आई यांना पुढे करतात आणि निवडणूक लढवतात. असे असले तरी आता यंदा निवडणूक लढवणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे.
काही गावांमध्ये तरुणी सदस्य आणि सरपंचदेखील होतात. जिल्ह्यात ममुराबाद, शिरसोली या गावांमध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.
त्यासोबतच असोदा, भादली या गावांमध्ये गेल्या वेळपेक्षा महिला उमेदवारांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे.
एकमेव तृतीयपंथी उमेदवार भादलीतून
जळगाव तालुक्यातील एकूण ६१९ महिला उमेदवार अंजली पाटील (जान अंजली गुरू संजना) या तृतीयपंथीने भादली येथील वॉर्ड क्रमांक चारमधून अर्ज भरला आहे. हा अर्ज नाकारण्यात आला. कारण हा वॉर्ड महिलांसाठी राखीव आहे. मात्र न्यायालयाने या उमेदवाराला लढण्याची परवानगी दिली आहे. आता अंजली पाटील भादलीमध्ये आपला प्रचार करण्यात व्यस्त आहे.
नशिराबादमध्ये फक्त एकच उमेदवार
जळगाव तालुक्यातील एकूण ६१९ महिला उमेदवार असल्या तरी नशिराबादला फक्त एकच उमेदवाराने माघार घेतलेली नाही आणि तीदेखील महिला उमेदवार आहे. नशिराबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या असलेल्या ८२ उमेदवारांपैकी ८१ उमेदवारांनी सामूहिक माघारीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रिंगणात एकच बिनविरोध झालेली महिला उमेदवार उभी आहे.
महिलांसाठी ५० टक्के आरक्षण
ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित असतात. ज्या ग्रामपंचायतीत सात प्रभाग आहेत तेथे चार, जेथे अकरा आहेत तेथे सहा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. त्यानुसार तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारांसाठी आरक्षण आहे. काही ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत, तर नशिराबादमध्ये सामूहिक माघारीचा निर्णय घेण्यात आला आहे.