धरणगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलणार-विजयी आभार सभेत गुलाबराव पाटील यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:34 PM2019-11-01T23:34:24+5:302019-11-01T23:38:07+5:30
शहरात विकास करून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार गुलाबराव पाटील यांनी विजयाच्या आभार सभेत दिली.
धरणगाव, जि.जळगाव : नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी धनरुपाने प्रतिष्ठेची करूनदेखील जनतेने मला भरभरुन आशीर्वाद दिला. जे जन करू शकले हे धन करू शकले नाही. त्यांच्याबद्दल न बोलता आपण विकासावर बोलू, असे सांगत शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांची घरे मला त्यांच्या नावावर करावयाची आहे. तसेच शहरात विकास करून शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार गुलाबराव पाटील यांनी विजयाच्या आभार सभेत दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सभेनंतर गुलाबराव पाटील यांची ही भरपावसात झालेली सभा आठवणीतील सभा राहिली. या सभेत प्रेक्षक जागा मिळेल तिथे उभे राहून उत्सुकतेने ऐकत होते.
येथील साने पटागंणावर शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा अभीष्टचिंतन सोहळा व विजयी आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या खोळंब्याने सभा उशिरा सुरू झाली. यावेळी गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, गजानन पाटील, नगरसेवक शरद तायडे, जि.प.सदस्य प्रताप पाटील, जि.प.सदस्य गोपाल चौधरी, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, माजी नगराध्यक्ष उषा वाघ, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, तालुकाप्रमुख गजानन पाटील, चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेना गटनेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चोधरी, विलास महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन, रत्ना धनगर, महिला तालुकाप्रमुख जनाबाई पाटील, किशोर कंखरे, तौसिफ सलीम पटेल, गायत्री जोशी, हेमांगी अग्निहोत्री यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाऊस असताना झालेली ही सभा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आठवण करून देत होते. सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी, तर आभार किरण अग्निहोत्री यांनी मानले.
हे ट्रेलर, मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर घेऊ सभा
या विजयी सभेत पाऊस सुरू असताना सभा ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र लोकांना बसायला जागा नसल्याने गुलाबराव पाटील यांनी सभा आटोपती घेत हे विजयी सभेचे फक्त ट्रेलर असून मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विजयी सभा पूर्णपणे होईल व त्या सभेत पूर्ण भाषणाची फटकेबाजी ऐकायला मिळेल, असे सांगितले.
अभिनंदनाचा वर्षाव
शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा वाढदिवस असल्याने त्यांना भेटणाऱ्यांची जिल्हाभरातून दिवसभर गर्दी होती. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.