मंत्र्यांच्या स्वागतप्रसंगी चेंगराचेंगरी, दोन महिला पदाधिकाऱ्यांसह 5 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:11 PM2020-01-01T17:11:54+5:302020-01-01T17:14:24+5:30
ही घटना जळगावात बुधवारी दुपारी रेल्वे स्थानकात घडली.
जळगाव : शिवसेनेचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागताला प्रचंड गर्दी उसळल्यामुळे रेल्वे स्थानकाच्या जिन्यावर चेंगरा-चेंगरी झाली. यामध्ये शिवसेनेच्या दोन महिला पदाधिका-यांसह पाच कार्यकर्ते जखमी झाले. ऐनवेळी काही पदाधिका-यांनी सावरल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना जळगावात बुधवारी दुपारी रेल्वे स्थानकात घडली.
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे बुधवारी दुपारी १२.१५ वाजता गितांजली एक्सप्रेसने पहिल्यांदा जळगावात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यातच प्रवाशांची संख्याही जास्त असल्याने गर्दीत प्रचंड वाढ झाली.
मंत्री गुलाबराव पाटील हे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत होते. त्याचवेळी जिन्यात एकच गर्दी होऊन काही कार्यकर्ते अचानक जिन्यात कोसळले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी या जखमी झाल्या. त्यांच्यासह बॅन्ड पथकातील एका युवकाचा हात मोडला गेला तर इतर दोन कार्यकर्त्यांचा पायाला देखील जखम झाली आहे. दोन्ही महिला पदाधिका-यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मंत्रीही अडकले गर्दीत
गुलाबराव पाटील हे देखील तुफान गर्दीते अडकले होते. मात्र, त्यांच्या ताफ्यातील पोलिसांनी त्यांना सुरक्षेचेकडे करीत जिन्याच्या एका बाजूला केले. गर्दी ओसरल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी गर्दी पांगवल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.