हाजी गफ्फार मलिक यांचे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान बहुमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:14 AM2021-06-06T04:14:00+5:302021-06-06T04:14:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोक संघर्ष मोर्चाने हाजी गफ्फार मलिक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोक संघर्ष मोर्चाने हाजी गफ्फार मलिक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी शोकसभेचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली. तसेच त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री एकनाथ खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, आमदार विद्या चव्हाण, खासदार ॲड. माजिद मेनन, खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, माजी आमदार मनीष जैन, जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, करीम सालार, सलीम इनामदार, वहाब मलिक, एजाज मलिक, माजी महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, प्रकाश गजभिये, फारुक शेख यांनी हजेरी लावली.
कोट -
गफ्फार मलिक हे राष्ट्रवादीच्या कुटुंबातील अनमोल रत्न होते. सत्ता असतानाही आणि नसतानाही ते सोबत राहिले. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. आता त्यांचे पुत्र एजाज यांनी पुढे यावे आणि त्यांचे काम हाती घ्यावे.
- सुप्रिया सुळे, खासदार
गफ्फार मलिक यांनी केलेल्या कामाची नोंद सर्व समाज घेईल. त्यांच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस कधीही अंतर देणार नाही.
- नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
गफ्फार मलिक यांनी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात बहुमूल्य काम केले. राज्यात फिरून अल्पसंख्याकांना राष्ट्रवादीशी जोडले. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे.
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस