चहार्डी-अकुलखेडा रस्त्यालगत निंबाच्या झाडांची दिवसाढवळ्या कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 03:09 PM2020-10-09T15:09:20+5:302020-10-09T15:10:59+5:30
चहार्डी-अकुलखेडा या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेली निंबाची मोठी पाच झाडे बुंध्यापासून कापून नेण्यात आली आहेत.
संजय सोनवणे
चोपडा, जि.जळगाव : चहार्डी-अकुलखेडा या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेली निंबाची मोठी पाच झाडे बुंध्यापासून कापून नेण्यात आली आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि चोपडा वनविभागाने बघ्याची भूमिका घेतली. मात्र याबाबत ‘लोकमत’ने विचारणा केली त्यावेळी धावपळ सुरू झाली. घटनास्थळी अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.
चहार्डीपासून अकुलखेड्याकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यालगत तीन किलोमीटर अंतरावर पाच भल्या मोठ्या लिंबाच्या या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एकीकडे शासन वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल सुरु होती.
वृक्ष तोडण्यासाठी परवानगी घेतलेली आहे का? अशी विचारणा लोकमत प्रतिनिधीने केली असता सदर वेळी मात्र वृक्षांची कत्तल करणाऱ्यांची तारांबळ उडाली आणि संबंधित अधिकाºयांना याबाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीला एकमेकांकडे बोटे दाखवली. नंतर मात्र घटना स्थळी वृक्षांची कत्तल झालेल्या ठिकाणी आर.एफ.ओ. यांनीही त्यांचे कर्मचारी पाठवले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाºयांनी भेट दिली. नंतर वन विभागाच्या अधिकाºयांनी कत्तल करणाºयांचे मशीन जप्त केले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी गणेश पाटील यांनीही या बाबतीत आमच्याकडून कोणतीही परवानगी नसल्याचे कळविले आहे. मात्र हे सर्व सोपस्कार आधी केले असते तर कदाचित हे पाच वृक्ष वाचू शकले असते.
पंचनामा, मशीन जप्त
वनविभागाचे परेड गार्ड कर्मचारी देवरे यांनी कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा केला आहे व कत्तलीसाठी वापरण्यात येणारे मशीन जप्त केले आहे.
-दत्तात्रय लोंढे, आरएफओ, चोपडा.
परवानगी नाही
पाच झाडांची कत्तल झाली आहे. वृक्ष तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.
-गणेश पाटील, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, चोपडा