सुखी व आरोग्यमयी जीवन पर्यावरणावर अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:51+5:302021-01-24T04:07:51+5:30
जळगाव : पर्यावरण हा मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ सुखी व आरोग्यमयी ...
जळगाव : पर्यावरण हा मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ सुखी व आरोग्यमयी जीवन हे पर्यावरणावर अवलंबून असते. मात्र याबद्दलची जागृती आपल्याकडे अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आता सर्वांनी पर्यावरणाशी जुळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची माहिती युनेस्को इंडिया व जलशक्ती मंत्रालयातर्फे पुरस्कारप्राप्त प्रज्ञा ठाकूर यांनी ‘लोकमत’ला दिली.
प्रज्ञा ठाकूर या मूळच्या जळगाव शहरातील आहेत. सद्यस्थितीला त्या पुण्यात वास्तव्यास असून पर्यावरण व जलसंवर्धनासाठी काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न : किती वर्षांपासून आपण पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहात?
ठाकूर : जळगावशी माझी जन्मत: नाळ जुळली आहे. गेल्या २७ वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. त्यातील २० वर्षे सामाजिक व पर्यावरण क्षेत्र अशा दृष्टिकोनातून काम करीत आहे. खरे तर पर्यावरण ही एक मूलभूत गरजांपैकी एक घटक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. सुखी जीवनासाठी पर्यावरणाशी जुळणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रश्न : कोणत्या प्रकल्पांवर काम केले?
ठाकूर : बऱ्याच गोष्टी या वागण्यातून, आचरणातून सुधारू शकतो. त्यातून आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. ही गरज लक्षात घेता सामाजिक क्षेत्राकडे वळले. पर्यावरण विषयातून मी सामाजिक संस्थांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पाणी, स्वच्छता, घनकचरा या प्रकल्पांवर काम केले़ सांडपाण्याचा पुनर्वापर यावरही काम केले. पंधरा वर्षांपासून स्वच्छता, पाणी, घनकचरा यावर काम सुरू आहे. दरम्यान, काम करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते. अमेरिका, केनिया, जर्मन तसेच युरोपियन संस्थांसोबत काम करण्याचीही संधी मिळाली.
प्रश्न : प्रकल्पांमध्ये किती महिलांचा सहभाग होता?
ठाकूर : पर्यावरण व जल संवर्धनासाठी तीन प्रकल्प राबविले. त्यामुळे सुमारे दहा हजार महिलांचा सहभाग होता. पाणी वाचवा या विषयावर महिलांना प्रशिक्षण दिले गेले. कारण, पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. नळ किती वेळ सुरू ठेवला तर किती पाणी वाया जाते, याची जाण महिलांना झाली. भांडी धुताना साबण लावत असताना नळ बंद करणे आवश्यक आहे. सुरू ठेवला तर लाखो लिटर पाणी वाया जाते, हेसुध्दा महिलांना कळले.
प्रश्न : कचऱ्याचे प्रमाण वाढले, यासाठी काय केले पाहिजे?
ठाकूर : कचरा व्यवस्थापनासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. याबाबत आम्ही पुण्यात महिलांना याबाबत प्रशिक्षण दिले. नाटिका बसवून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात जनजागृती केली. विदेशात तीन प्रकारच्या कचरापेट्या असतात़ जिथे कचरा असतो, तिथेच त्याचे वर्गीकरण केले जाते. अमेरिकेत चुकीच्या डब्यात कचरा टाकला तर दंड होतो. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे.
२७ वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. प्रत्येक नागरिकाला आता पर्यावरणाशी जुळणे आवश्यक आहे. दुसरीकडे घरात हवा आणि प्रकाश हे खेळते असायला हवे. यामुळे घरातील कुटुंबीयांचे आरोग्य उत्तम असते. त्यामुळे पर्यावरण संर्वधनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे.
- प्रज्ञा ठाकूर