लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरूवारी कोरोना रुग्णांची उच्चांक वाढ नोंदविण्यात आली. कोरोनाने अखेर पाचशेचा टप्पाही ओलांडला असून गुरूवारी जिल्ह्यात तब्बल ५४८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे यात शहरात सहा महिन्यानंतर कोरोनाचे एकाच दिवसात २४८ रुग्ण आढळून आले आहेत. या आधी सहा सप्टेंबर रोजी २४० रुग्णांची नोंद आहे.
कोरोना संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढत असला तरी यात गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचा तज्ञ दावा करीत आहेत. मात्र, दिवसेंदिव वाढणारे हे आकडे सर्वांच्याच चिंतेत भर टाकणारे असून प्रशासन नेमकी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेली ही रुग्णवाढ कायम असून यात गुरूवारी कोरोनाने जिल्ह्यात कहर केला. चोपडा तालुक्यातही झपाट्याने कोरोनाचा फैलाव होत असून या ठिकाणी ८३ रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहरातील ८२ वर्षीय वृद्धाचा तर बोदवड तालुक्यातील ५१ वर्षीय प्राैढाचा मृत्यू झाला आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या वाढली
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या अगदीच झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. ही संख्या ३६०५ वर पोहोचली असून यात ८८५ रुग्णांना विविध लक्षणे आहेत. उर्वरित २७२० रुग्णांना लक्षणे नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हे आहेत पाच हॉटस्पॉट
जळगाव शहर : २४८
चोपडा : ८३
भुसावळ : ४६
चाळीसगाव : ४५
जामनेर : ४५
पॉझिटिव्हिटी (अहवालांमध्ये बाधितांचे प्रमाण)
आरटीपीसीआर : २७.२ टक्के
ॲन्टीजन : २२ टक्के
गुरूवारी झालेल्या चाचण्या आलेले अहवाल
आरटीपीसीआर आलेले अहवाल : ८३८
आरटीपीसीआर चाचण्या : १८२८
ॲन्टीजन चाचण्या : १४२७
तर प्रशासनाशी समन्वय साधून निर्णय : डीन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही दाखल होणाऱ्या कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत इकरा कोविड हेल्थ सेंटर व महापालिकेचे कोविड केअर सेंटर यांच्याशी वारंवार समन्वय साधून लक्षणे नसलेल्या रुग्णांना त्या ठिकाणी दाखल केले जात आहे. सद्य स्थितीत परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे, मात्र, रुग्ण आणखी वाढल्यास प्रशासनाशी समन्वय साधून निर्णय घेण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी म्हटले आहे. गुरूवारी सी १ कक्षात ११, सीटू कक्षात ६९, सीथ्री कक्षात १३ असे रुग्ण दाखल आहेत. यासाठी स्वतंत्र डॉक्टर व नॉन कोविडसाठी स्वतंत्र डॉक्टर अशी यंत्रणा लावावी लागत असल्याचे या ठिकाणी चित्र आहे.