भादलीसारखे हत्याकांड घडविण्याची धमकी देत पत्नीला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:24 AM2021-02-23T04:24:38+5:302021-02-23T04:24:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : न्यायालयात पती-पत्नीचे घटस्फोटाचे प्रकरण सुरु असतानाच जावयाने सासऱ्याला चावा घेऊन मेडिकलवर बसलेल्या पत्नीला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : न्यायालयात पती-पत्नीचे घटस्फोटाचे प्रकरण सुरु असतानाच जावयाने सासऱ्याला चावा घेऊन मेडिकलवर बसलेल्या पत्नीला रिक्षातून जबरदस्तीने पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ११ वाजता दूध फेडरेशनजवळ घडला. दरम्यान, भादलीसारखे हत्याकांड घडविण्याचीही धमकी जावयाने दिली आहे. याप्रकरणी सासरे शिवाजी जयराम पाटील (रा.वडनगरी, ता.जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन जावई प्रशांत दत्तू पाटील (रा.गौरीशंकर अपार्टमेंट, धांडेनगर) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वडनगरी येथे शिवाजी पाटील हे पत्नी आशाबाई मुलगी अश्विनी, मुलगा गणेश यांच्यासह वास्तव्यास आहेत. शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. मुलगी अश्विनी हिचा १ डिसेंबर २०१६ रोजी धांडेनगर येथील प्रशांत दत्तू पाटील याच्याशी विवाह झाला. दोघांना एक मुलगी आहे. लग्नानंतर काही दिवसात पती प्रशांत हा त्रास देत असल्याने अश्विनी, तिची मुलगी माही हे तीन वर्षापासून माहेरी वडनगरी येथे राहत आहेत. अश्विनीचे मेडीकलचे लायसन्स असल्याने वडिलांनी तिला दूध फेडरेशन परिसरत मेडीकल सुरु करुन दिले. अश्विनी व तिचा भाऊ गणेश हे दोघे मेडीकल सांभाळतात.
पत्नीला जबरदस्तीने रिक्षात बसविले
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील हे मुलीच्या मेडीकलवर गेले. याठिकाणी मुलगी अश्विनीसोबत जावई प्रशांत पाटील बसलेला होता. सासऱ्यांनी जावई प्रशांत याला न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरु असताना तू इथं का आला, असे म्हटले असता प्रशांत याने शिवाजी पाटील यांना शिवीगाळ केली. तसेच तुला व तुझ्या संपूर्ण परिवाराला जिवंत ठेवणार नाही, भादलीला ज्याप्रमाणे घटना घडली आहे, तशी अवस्था तुमची करुन टाकीन अशी धमकी देत मारहाण करायला सुरुवात केली, त्यानंतर डाव्या हाताच्या बोटाला चावा घेवून दुखापत केली, यानंतर प्रशांत हा पत्नीला रिक्षात (क्र.एम.एच.१९ -८४४१) बसवून जबरदस्तीने घेवून गेला. यावेळी मेडीकलमध्ये असलेल्या पंकज बाळू सोनवणे, चंद्रकिरण लोटू पाटील यांनी शिवाजी पाटील यांना सोबत घेत पोलीस ठाणे गाठले. शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत दत्तू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रवींद्र पाटील हे करीत आहेत.
--