मेहुण्याला वाचवायला गेला अन् शालकही टाकीत बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:17+5:302021-05-16T04:15:17+5:30
मजुरी वाटपासाठी आलेल्या ठेकेदाराचाही मृत्यू : कांचननगरात शोककळा जळगाव : जुन्या एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्समध्ये झालेल्या दुर्घटनेत दिलीप अर्जुन सोनार ...
मजुरी वाटपासाठी आलेल्या ठेकेदाराचाही मृत्यू : कांचननगरात शोककळा
जळगाव : जुन्या एमआयडीसीतील समृद्धी केमिकल्समध्ये झालेल्या दुर्घटनेत दिलीप अर्जुन सोनार व मयूर विजय सोनार हे दोघेही नातेवाईक असून दिलीप हे मयूरचे सख्खे मेहुणे होते. मेहुण्याला वाचवतानाच शालकाचा मृत्यू झालेला आहे. यातील तिसरी मयत व्यक्ती रवींद्र कोळी हे कंपनीत मजूर कंत्राटदार होते. शनिवार असल्याने मजुरांना पगार देण्यासाठी कंपनीत आलेले होते. मात्र, पगार वाटपापूर्वीच अशी दुर्घटना घडली.
या घटनेतील तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यावर नातेवाइकांना तब्बल दोन तासांनी घटना कळली. कंपनी मालकाकडून या घटनेची माहिती देण्यात आली नाही. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पोस्ट व बातम्यांवरून नातेवाइकांना या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठले. कंपनी मालकावर आरोपांच्या फैरी झाडून तीव्र संताप व्यक्त केला. दिलीप व मयूर या दोघांच्या पत्नीने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला त्यांचा हा आक्रोश मन हेलावणारा होता.
इतर कामगारांचाही आक्रोश
कंपनीतील इतर कामगार देवीदास सपकाळे, गौरव धनगर, शरद पाटील व संतोष पाटील, महेश जाधव यांनी तिघांना टाकीतून काढून रुग्णालयात हलवले. यात कंपनी मालकाचा मुलगा जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या तिघांमध्ये कंत्राटदार रवींद्र कोळी यांचाही मृत्यू झाल्याचे कामगारांना चार तासांनी समजले. या कामगारांनी देखील रुग्णालयात आक्रोश केला.
कंपनीतील उत्पादन व परवान्याची पडताळणी
या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कंपनीत जाऊन तेथे एकेका विभागाची पाहणी केली. त्याशिवाय कंपनीत उत्पादित होणारे उत्पादन तसेच कच्चा माल, प्रक्रिया होणारा माल याची तपासणी करून कामगारांकडून माहिती जाणून घेतली. कंपनीत उत्पादित होणाऱ्या मालाच्या संदर्भात तसेच कच्चा माल याबाबत संबंधित यंत्रणेच्या आवश्यक परवानग्या आहेत का? याची पडताळणी करण्याचे आदेश त्यांनी एमआयडीसी पोलिसांना दिले. ॲल्युमिनियम सल्फेट व सोडियम सल्फेट याचा वापर करून शेतीला लागणारे रासायनिक खत निर्माण केले जात असल्याचे कामगारांनी पोलिसांना सांगितले. या दोन्ही केमिकलची पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी पाहणी केली.
दहा वर्षांपासून कामाला
दिलीप सोनार यांच्या पश्चात पत्नी राणी, मुलगी धनश्री, हर्षदा, गायत्री व मुलगा स्वामी असा परिवार आहे. दिलीप सोनार दहा वर्षांपासून या कंपनीत कामाला होते. तर त्यांचे शालक मयूर सोनार यांच्या पश्चात आई दुर्गाबाई, पत्नी आरती, मुलगा भावेश (१०) व मुलगी कणा (१२) असा परिवार आहे. मयूर दोन वर्षांपासून कामाला होते. दोघांची बारा तासांची ड्युटी त्या कंपनीत होती. रवींद्र कोळी यांच्या पश्चात पत्नी आरती, आई सीताबाई, वडील दगडू किसन कोळी, मुलगा साई (५) मुलगी परी (३) असा परिवार आहे.