दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:17+5:302021-03-18T04:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील २१७ रुग्णांसह जिल्ह्यात ९९६ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. शहरातील एका मृत्यूसह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील २१७ रुग्णांसह जिल्ह्यात ९९६ नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. शहरातील एका मृत्यूसह जिल्ह्यात सात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोना हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला असून ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याचे चित्र आहे. बुधवारी ५९७२ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या मानल्या जात आहेत.
शहरातील सर्वच भागात कोरेानाचा फैलाव झाला असून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. होम आयसोलेशनसह अन्य सर्व नियम कडक करण्यात आल्याने आता रुग्णसंख्या समोर येत आहेत. दुसरीकडे चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. बुधवारी १३१८ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या तर १२७० अहवाल प्राप्त झाले. ॲन्टीजनमध्ये ६५९ तर आरटीपीसीआरमध्ये ३३७ रुग्ण समोर आले आहेत. नेहमीप्रमाणे जळगाव शहरातच सर्वाधिक बाधित आढळून आले आहेत.
जळगावात १४७ टक्क्यांनी वाढला कोरोना
गेल्या पंधरा दिवसात जळगावात कोरेानात तब्बल १४७ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यातील चिंताजनक स्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या आठ दिवसात ८ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सक्रिय रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंताजन स्थिती असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे.