मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील हेमाडपंथी महादेव मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 03:48 PM2019-08-04T15:48:25+5:302019-08-04T15:53:36+5:30
मुक्ताईनगर येथून १६ कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर वडगाव येथील महादेव मंदिर पुरातन महादेव मंदिर आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील वडगाव येथील महादेव मंदिर हे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात पुरातन असे हेमाडपंथी महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचे अंतर आणि बाह्य भागातील कोरीव शिल्प या मंदिराच्या पौराणिकतेचे दाखले देतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरावर भाविकांची गर्दी आणि अन्नदान यामुळे भाविकांची मांदियाळी असते.
मुक्ताईनगर येथून १६ कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावर हे पुरातन महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात आजही कोरीव शिल्प केलेले खांब पडून आहेत. मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे मंदिर परिसरात एक पुरातन पाय विहिर असल्याचे असल्याचे सांगण्यात येते आणि त्यातून मध्य प्रदेश असीरगड आणि चारठाणा भवानी मंदिराला जाणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या गाभाºयात नेहमी अंधार असतो. या ठिकाणी विजेचा दिवा टिकत नसल्याचे सांगितले जाते.
श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरावर भाविकांची मांदियाळी असते. अन्नदान करणाऱ्यांचे येथे नंबर लागतात. मंदिरावर महेंद्र भरती महाराज यांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य असून, ते याठिकाणी देखरेख करतात.