रावेरमधील हाय ग्रीड पॉवर टॉवरलाईनचा गाशा गुंडाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 06:57 PM2019-05-08T18:57:10+5:302019-05-08T18:58:35+5:30
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यादरम्यान असलेला विद्युत पारेषणचा करार संपुष्टात आल्याने सीमावर्ती भागात असलेल्या ‘हाय-ग्रीड-पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरलाईनचा व मुख्य वीजवाहिनीचा गाशा गुंडाळण्यात येत असल्याचे शेतीशिवारात चित्र दिसत आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यादरम्यान असलेला विद्युत पारेषणचा करार संपुष्टात आल्याने सीमावर्ती भागात असलेल्या ‘हाय-ग्रीड-पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरलाईनचा व मुख्य वीजवाहिनीचा गाशा गुंडाळण्यात येत असल्याचे शेतीशिवारात चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात विद्युत पारेषणाचा करार संपुष्टात आल्याने बºहाणपूर ते भुसावळ दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून बनावट अवस्थेत उभी असलेली ‘हाय- ग्रीड पॉवर ट्रान्समिशन टॉवर’ लाईन धुळखात पडून होती. तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या शेतीशिवारातील ‘हाय-ग्रीड पॉवर’ ट्रान्समिशन टॉवरची व त्यावरील हाय- ग्रीड मुख्य विद्युत वाहिन्या तथा इन्सुलेटर जमा करण्याची मोहीम संबंधित कंत्राटदार कंपनीकडून धडाक्यात सुरू आहे.
महापारेषणच्या संबंधित कंत्राटदाराकडून हाय ग्रीड पॉवर ट्रान्समिशन टॉवर लाईनची मोडतोड सुरू आहे. यामुळे तालुक्यातील सीमावर्ती भागातील खानापूर शिवारात टॉवर लाईनच्या हाय-ग्रीड पॉवर ट्रान्समिशनच्या तारा लोंबकळत दिसल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली होती. यासंबंधी, महावितरणचे रावेर येथील उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, महापारेषण कंपनीकडून दोन्ही राज्यादरम्यान आंतरराज्यीय करार संपुष्टात आल्याने हाय-ग्रीड पॉवर ट्रान्समिशन टॉवरलाईनची मोडतोड सुरू असल्याने शेतकऱ्यांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.