अन्याय झाल्यावरच निष्ठा कशी आठवते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 09:34 PM2019-03-31T21:34:13+5:302019-03-31T21:34:22+5:30
आमदार, खासदारकीनंतर पक्षाने नवा उमेदवार दिला तरीही डॉ.गुणवंतराव सरोदे यांनी निर्णय मान्य केला होता, भाकरी फिरवलीच नाही तर कार्यकर्ते टिकणार कसे? संघटना वाढणार कशी? राजकीय पक्षांपुढे पेच
मिलिंद कुलकर्णी
जळगाव - भाजपाने लोकसभा निवडणुकीत ‘महापालिका पॅटर्न’ राबविण्याचे ठरविलेले दिसतेय. इलेक्टीव मेरीट असलेल्या आणि पक्षात अन्याय होत असलेल्या दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करायचे हा झाला महापालिका पॅटर्न. त्याच पॅटर्नच्या बळावर जळगाव, धुळे, नाशिकमध्ये यश मिळविले गेले. हे करीत असताना स्वपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना डावलले गेले तरी चालेल, पण विजय महत्त्वाचा, असे सोयीस्कर तत्त्वज्ञान तयार झाले आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे हत्यार पक्षाकडे आहेच.
खान्देशात काँग्रेस,राष्टÑवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरविली आहे तर भाजपाने केवळ जळगाव मतदारसंघात उमेदवार बदलला आहे. नंदुरबारमधील ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांनी उघड नाराजी व्यक्त केली तर त्यांचे पूत्र भरत यांनी अपक्ष लढण्याची उघड भूमिका घेतली. प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीनंतर नाराजी दूर झाली आहे. जळगावात ए.टी.पाटील बंडाच्या भूमिकेत आहेत. पारोळ्यात त्यांनी मेळावा घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर षडयंत्र रचल्याचा आरोप केला. सर्वेक्षण नकारात्मक असल्याने आणि खरे कारण त्यांनाच (ए.टी.पाटील) माहित असल्याचे विधान महाजन यांनी केले आहे. गुरुवारपर्यंत त्यांचा निर्णय स्पष्ट होईल.
या घडामोडीवरुन राजकीय पक्षांमधील अंतर्गत वातावरण आणि निवडणुकीचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे, हे स्पष्ट होते. कुणालाही प्रतिक्षा नकोय. सत्ता फक्त आपल्याच हातात हवी. पण त्यांना याचे विस्मरण होत आहे की, त्यांना तिकीट देताना कुणाला तरी नकार दिला गेला होताच.
याठिकाणी आठवण होते ती, माजी खासदार स्व.डॉ.गुणवंतराव सरोदे यांची. भाजपाचे जळगाव जिल्ह्यातील पहिले आमदार म्हणून ते १९८५ मध्ये रावेर मतदारसंघातून विजयी झाले. १९९१ मध्ये तत्कालीन जळगाव मतदारसंघातून भाजपाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. १९९६ मध्ये दुसऱ्यांदा ते विजयी झाले. १९९८ मध्ये ते पराभूत झाले. १९९९ मध्ये भाजपाने स्व.वाय.जी.महाजन यांना तिकीट दिले. रावेर विधानसभा मतदारसंघातही पक्षाने अरुण पांडुरंग पाटील यांना संधी दिली. डॉ.सरोदे यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता पक्षादेश शीरोधार्ह मानला. गेल्या वर्षी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाशी ते एकनिष्ठ राहिले. असेच उदाहरण धुळ्याच्या लखन भतवाल यांचे आहे. नंदुरबारसह असलेल्या संयुक्त धुळे जिल्ह्यात पूर्वीच्या जनसंघापासून ते आताच्या भाजपाचे जाळे विस्तारण्याच्या कार्यात अग्रभागी राहिले. आदिवासी पट्टयातील त्यांच्या कार्यामुळे ‘भतवाल’ऐवजी ‘पावरा’ हे आडनाव त्यांना चिकटले. या निस्वार्थी नेत्याने कधी विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, पद्मश्री पुरस्कार अशी अपेक्षा केली नाही. वयाच्या पंचाहत्तरीतही हा नेता पक्षकार्यात सक्रीय आहे.
सरोदे, भतवाल यांच्यासारखी उदाहरणे सगळ्याच पक्षात आहेत. पण अलिकडे राजकीय पक्षांमध्ये बदल झाला आहे. झटपट यश मिळायला हवे, ही मानसिकता वाढायला लागली आहे.
पक्ष, नेते आणि कार्यकर्ते हा एक परिवार आहे. त्याग, समर्पण या भावना असल्या तर परिवाराची प्रगती होते, हे लक्षात घेतले तर आताच्या कोलांटउड्या दिसणार नाही.
माणिकराव गावीत, ए.टी.पाटील, अनिल गोटे या नेत्यांनी अन्यायाची भाषा वापरत स्वपक्षावर निशाणा साधला आहे. भाजपा, काँग्रेस यांसह सर्वच राजकीय पक्षांपुढे पेच निर्माण झाला आहे. भाकरी फिरवायची म्हटली तर प्रस्थापित नेते नाराज होतात, फिरवली नाही तर नवोदित, कार्यक्षम नेते, कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने तेही नाराज होतात. ए.टी.पाटील यांना राष्टÑवादीतून घेऊन भाजपाने खासदारकीची संधी दिली. अनिल गोटे यांना मोदी लाटेत पक्षाने धुळ्यात संधी दिली. मनासारखा निर्णय पक्षाने घेतला नाही, तर लगेच निष्ठावानांवर अन्यायाची भाषा कशी बोलली जाते, हे आश्चर्य आहे.