जळगाव : कापसाच्या नवीन हंगामाला लवकरच सुरुवात होणार असून, यंदा आतंरराष्ट्रीय बाजारात कापसाची स्थिती कशी राहील? याबाबत मंथन करण्यासाठी जळगावातील जैन हिल्सवर ऑल इंडिया कॉटन ट्रेड मिटचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातून १५० पेक्षा जास्त कापूस व्यापारी आणि शासनाच्या संबधित विभागांचे अधिकारी जळगावला दाखल झाले आहेत. त्यांनी पाळधी ता. धरणगाव येथे काही शेतांमधील कापसाची पाहणी केली असल्याची माहिती माहिती खान्देश जिनींग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली आहे. तसेच रविवारी ही परिषद होणार आहे.
शनिवारी दुपारी जळगावात दाखल झालेल्या टेक्सटाईल कमिशनर उषा पोळ यांच्यासह व्यापाऱ्यांनी पाळधी भागातील काही शेतांना भेटी दिल्या. तेथील कापसाची गुणवत्ता तपासून पाहिली. त्यात कापूस व्यापाऱ्यांना जळगाव भागात पिकवल्या जाणाऱ्या कापसाची गुणवत्ता नेमकी कशी आहे. याची माहिती कृषी संशोधक डॉ.बी.जी.जडे यांनी दिली. यावेळी जिनिंग असोसिएशनचे अनिल सोमाणी, ज्ञानेश्वर भामरे, जीवन बयस उपस्थित होते.
या परिषदेत कापसाच्या जिनींगचा दर्जा हा नविनतम मशिनरीच्या व तंत्रज्ञानाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा कसा करता येईल, २०२२ मधील कापूस हंगाम कसा राहील, याबाबत देशभरातील जिनर्स, भारत व महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, कॉटन व्यावसायातील जाणकार सहभागी होणार आहेत. या परिषदेत जिल्ह्यातील काही मोठ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.