पोळ्याची शेकडो वर्षांची परंपरा यंदा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:46 AM2020-08-19T11:46:01+5:302020-08-19T11:46:14+5:30
कोरोनामुळे यंदा कार्यक्रम स्थगित : नशिराबाद, जळगाव येथील पारंपारिक पोळा सणाला होते मोठे महत्त्व
जळगाव : शहर आणि परिसरात पोळा सणाची अनेक वर्षांची पंरपरा यंदा कोरोनामुळे पहिल्यांदाच खंडित झाली. जळगावच्या पोळा सणाला १५० तर नशिराबादच्या सणाला २५० वर्षांची परंपरा आहे. यंदा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार गर्दी टाळण्यासाठी हे कार्यक्रमच रद्द करण्यात आले.
जुन्या जळगावातील ग्रामदैवत श्रीराम रथोत्सवाप्रमाणे येथील पोळ््यानिमित्त निघणाऱ्या राजा-सर्जाच्या मिरवणुकीला दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे जुन्या जळगावातील पोळ््याच्या मिरवणुकीची दीडशे वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे. कोरोनामुळे यंदा पहिल्यादाचं साध्या पद्धतीने पोळा सण साजरा करण्यात आल्याची माहिती जुने जळगावातील पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी दिली.
दरवर्षी पोळा सणाला जुन्या जळगावातील नागरिकांतर्फे पांझरपोळ संस्थान येथून बैलांच्या मिरवणुकीला सुरूवात करण्यात येते. बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून, वाजत-गाजत ही मिरवणुक काढण्यात येते. या ठिकाणी जळगावातील विविध भागातील नागरिक देखील त्यांच्याकडील बैलजोड्या आणत असतात.
यावेळी शेतकरी बांधव व पाहण्यासाठी येणाºया नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. या ठिकाणाहून मिरवणुक निघाल्यानंतर रथ चौकातील श्रीराम मंदिराचे दर्शन व सुभाष चौकातील भवानी मातेचे दर्शन घेऊन शेतकरी बांधव आपल्या राजा-सर्जाच्या जोडीला विविध ठिकाणी पुजेसाठी नेत असतो.
मात्र, यंदा कोरोनामुळे येथील नागरिकांतर्फे जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार कुठलिही मिरवणुक काढण्यात आली नाही.
पलोड स्कूलमध्ये पोळा आॅनलाईन साजरा
जळगाव : काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये पोळा हा सण आॅनलाईन साजरा करण्यात आला. सुरुवातीला मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली. प्राचार्य अमित सिंह भाटिया, समन्वयिका स्वाती अहिराव, अनघा सागडे, समाधान पाटील, अमर जंगले उपस्थित होते. साची बोरसे या विद्यार्थिनीने बहरदार नृत्यगीत सादर केले. त्यानंतर पोळा सणाबद्दल माहिती सारा तडवी या विद्यार्थिनीने दिली. पोळ्याचे महत्त्व प्रांजल मराठे या विद्यार्थिनीने सांगितले. शेतकरी बांधवांच्या घरी पोळा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, यावरील चित्रफित विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. नियोजन भारती अत्तरदे, तेजस्वी बाविस्कर, कमल सपकाळे यांनी केले तर तांत्रिक नियोजन निलेश बडगुजर, प्रदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन तेजस्वी बाविस्कर यांनी केले तर आभार दिग्विजय पाटील यांनी मानले.
पांजरापोळ संस्थानमध्ये बैल पोळा साजरा
जळगाव : शहरातील पांजरापोळ संस्थानमध्ये पोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी बैलांच्या शिंगांना रंग लावून सजवण्यात आले तसेच त्यांना गोडधोड खाऊ घालण्यात आले. यावेळी बैलपूजनही पार पडले.शहरात १२५ वर्षे प्राचीन पांजरापोल संस्था आहे. तेथे एक हजारपेक्षा जास्त गोमातेचे संगोपन केले जाते. मागील आठ वर्षात संपूर्ण जागेचा कायापालट करुन आधुनिक पद्धतीचा अवलंबन करुन गायीची देखभाल केली जात आहे. पोळा सणानिमित्त मंगळवारी संस्थानच्या आवारात सजावट करुन बैलांना अंघोळ घालून नवीन साज गोंड़े, नाथ, मोरखी, दोर, शिंगांना रंग लावून सजविण्यात आले. संस्थानच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत पूजन करण्यात आले. नंतर सर्व बैलांना पुरण पोळी, भिजवलेली डाळ, गूळ खाऊ घालण्यात आले. त्यानंतर आवारातच मिरवणुकीद्वारे मारुती मंदिर येथे दर्शनसाठी नेण्यात आले. कार्यक्रमात ट्रस्टी दिलीप गांधी, लक्ष्मीकांत मणियार, अशोक धूत, दिलीप व्यास, लक्ष्मीकांत वाणी उपस्थित होते. पोळा सणानिमित्त सर्व कर्मचाºयांना ट्रस्टी दिलीप गांधी यांच्यातर्फे जिलेबी पाकिट वितरित करण्यात आले.
शानभाग विद्यालय
जळगाव : ब. गो .शानभाग, सावखेडा येथे बैलपोळा हा सण आॅनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंत टेंभरे, विभागप्रमुख जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी यात वेदश्री देशमुख, मनोज जाधव, पायल पाटील, प्रणव पाटील, भगिरथ बारी, पल्लवी हटकर, गायत्री पाटील, प्रतिक सोळूंके, आकांक्षा पाटील, दक्षा बेदमुथा, प्रथमेश कोळी, मानसी कुलकर्णी, श्रावणी देवकर आणि दर्शन पाटील यांनी वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगितली.