लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या पत्नीचे स्वागत ओवाळून केल्याची घटना जळगावात घडली आहे. येथील नरेश बागडे यांच्या पत्नी राधिका यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर जेव्हा त्या घरी परतल्या, तेव्हा पती नरेश यांनी ओवाळून त्यांचे स्वागत केले. या आगळ्या वेगळ्या स्वागताची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पतीने ओवाळल्यावर राधिका यांना अश्रू अनावर झाले होते.
बागडे दाम्पत्य सावखेडा रस्त्यावरील सोनी नगरात राहतात. राधिका यांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सुरुवातीला दोन ते तीन दिवस फॅमिली डॉक्टर प्रशांत मंत्री यांच्या सल्ल्यानेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. नंतर मात्र नरेश यांचे भाऊ विजय यांच्या सल्ल्यानुसार १५ एप्रिल रोजी त्यांना इकरा महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना ऑक्सिजन लावावा लागला. त्याला राधिका यांनी नकार दिला. त्यानंतर नरेश यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर राधिका यांनी ऑक्सिजन लावण्यास होकार दर्शवला. मधल्या काळात नरेश, विजय यांच्यासोबत अजय बागडे व इतर कुटुंबीय राधिका यांना धीर देत होते. अखेर ही कोरोनावरील लढाई जिंकून राधिका घरी आल्या. त्या घरी आल्यावर नरेश यांनी त्यांचे ओवाळून स्वागत केले. एरवी पत्नी पतीचे ओवाळून स्वागत करते. मात्र, येथे पतीने पत्नीचे ओवाळून स्वागत केल्याने राधिका यांना गहिवरून आले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रूदेखील आले होते.
कोट -
पत्नीला रुग्णालयात सोडायला देखील मीच गेलो होतो आणि घरी देखील मीच आणले. या काळात अनेकांनी मोलाची साथ दिली. जेव्हा तिला ओवाळले, तेव्हा ती खूप भावुक झाली होती. ती कोरोना विरोधातील लढाई जिंकून घरी आली आहे. - नरेश बागडे