लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून लस नसल्याने शहराली काही केंद्र बंद होती. मात्र, शुक्रवारी कोविशिल्ड लसीचे जिल्ह्यासाठी ३८ हजार २०० डोस आल्यानंतर यातील ४ हजार डोस हे शहरातील केंद्रांना देण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी महापालिकेच्या ९ तसेच रोटरी भवन व रेडक्रॉस सोसायटीच्या केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यातील ८ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण आहे.
शहरात गेल्या आठवड्यात जम्बो लसीकरण झाल्याने तीनच दिवसात कोविशिल्डचे दहा हजार डोस संपले होते. यात सायंकाळी उशीरापर्यंत केंद्र सुरू ठेवून अधिकाधिक लसीकरण करण्यात आले. दरम्यान, त्यानंतर तीन दिवस कोविशिल्ड लस नव्हती, शुक्रवारी जिल्ह्यात प्राप्त झाल्यानंतर त्यातील २ हजार डोस महापालिकेच्या केंद्रांना तर २ हजार डोस हे रोटरी व रेडक्रॉसला देण्यात आले आहे. यासह कोव्हॅक्सिनचे जिल्ह्याला ८ हजार डोस प्राप्त झाले असून यातील ४ हजार डोस हे शहरासाठी देण्यात आले आहेत.
आरोग्य केंद्रांना वाढीव लस
गेल्या आठवड्यात आरोग्य केंद्रांना कमी साठा मिळाला होता. याचा ग्रामीण भागातील लसीकरणावर परिणाम होत असल्याचा सूर मध्यंतरी समोर आला होता. त्यानुसार आता प्रत्येक आरेाग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांना नियमीतपेक्षा १०० डोस वाढवून देण्यात आले आहेत.
असे आहे लसीकरण
महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन, शाहिर अमर शेख, काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय, पिंप्राळा मनपा शाळा कांताई नेत्रालय, रेडक्रॉस व रोटरी भवन या ठिकाणी कोविशिल्ड लस १८ ते ४४ वयोगटासाठी राहणार आहे. यासह कांताई नेत्रालय, नानीबाई रुग्णालयात ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड तर चेतनदास मेहता रुग्णालयात सर्व वयोगटासाठी कोव्हॅक्सिन उपलब्ध राहणार असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी कळविले आहे. तर रोटरीभवन येथे ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्डही तसेच सर्व वयोगटासाठी कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहे. असे रेडक्रॅासचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी सांगितले आहे.