भीमराज की बेटी मै तो जय भीमवाली हूँ । शाहीर प्रतापसिंग बोदडे यांची मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:15 AM2020-07-05T00:15:34+5:302020-07-05T00:16:09+5:30
लहानपणापासून आपल्यावर प्रसिद्ध शाहीर व विचारवंत वामनदादा कर्डक यांचा प्रभाव आहे. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन काम करीत आहे. ‘उमर मे बाली, भोली भाली, शिल की झोली हू, भीमराज की बेटी मै तो जय भीम वाली हू’ या गीताने आपल्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले असल्याचे मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध शाहीर, गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे प्रतापसिंग बालचंद बोदडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विनायक वाडेकर ।
मुक्ताईनगर, जि.जळगाव : लहानपणापासून आपल्यावर प्रसिद्ध शाहीर व विचारवंत वामनदादा कर्डक यांचा प्रभाव आहे. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन काम करीत आहे. ‘उमर मे बाली, भोली भाली, शिल की झोली हू, भीमराज की बेटी मै तो जय भीम वाली हू’ या गीताने आपल्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले असल्याचे मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध शाहीर, गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे प्रतापसिंग बालचंद बोदडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूल्यांची जपणूक करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा असलेले, महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर व विचारवंत वामन कर्डक यांचे शिष्य म्हणून मुक्ताईनगर येथील शाहीर प्रतापसिंग बालचंद बोदडे म्हणजेच सिर्फ नामही काफी है या उक्तीनुसार प्रचलित असलेले सामाजिक प्रबोधन आणि गीतांच्या माध्यमातून युवकांना नैतिक आचरणाचे धडे देणारे व्यक्तिमत्व म्हणून नावाजलेले आहेत.
प्रश्न : ख्यातनाम शाहीर वामन कर्डक यांचा तुमच्यावर प्रभाव कसा पडला व त्यांचे शिष्य म्हणून तुम्ही केव्हापासून कार्य सुरू केले?
१९६८ ला पुणे विद्यापीठातील प्री युनिव्हर्सिटी कोर्स मी मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे करत होतो. त्यावेळी शाहीर वामनदादा कर्डक हे औरंगाबाद येथे आले होते. लहानपणापासून वामनदादा यांचे नाव ऐकून होतो. त्यांच्या गीतांमध्ये सामाजिक समरसता, आंबेडकरी विचार आणि प्रबोधन यासारखे महत्वाचे विषय असायचे. त्यामुळे मला बालपणापासून त्यांचा व त्यांच्या गीतांचा लळा लागला होता. माझ्या सुदैवाने दादांची भेट औरंगाबाद येथे झाली व मी माझ्यातील बालपणापासूनची गायनाची असलेली आवड त्यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी मला त्यांचे शिष्य म्हणून स्वीकारले.
प्रश्न : प्रतापसिंग बोदडे ते बब्बू कवाल ह्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल?
उत्तर : बालपणापासून मला शायरीची आणि गायनाची आवडही होतीच. त्यातच वामनदादांच्या विचारांचा व गीतांचा प्रभाव माझ्यावर पडलेला असल्याने मी जेव्हा मराठवाडा विद्यापीठात एम.ए. करत होतो त्यावेळी वामनदादांची भेट झाली आणि मी गायनाला सुरुवात केली. अर्थातच शिक्षण व गायन हे माझे दोन्ही वाढत गेले. कॉलेजला असताना ढोलकी व हार्मोनियम वादक जरी सोबत असले तरी मी गायन करायला लागलो. त्यावेळी नगर येथील आदिनाथ भुईंगळ आणि अमरावती येथील आत्माराम अभ्यंकर हे मला ढोलकी व हार्मोनियमसाठी अनुक्रमे मदत करत होते. माझ्या गायनाचा व आवाजाचा प्रभाव इतका आगळा वेगळा होता की मला गीत गाण्यासाठी विचारणा होऊ लागली व त्यावेळी माझे नाव बाबू कव्वाल म्हणून ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे शिक्षण घेत असतानाच बब्बू कवाल हा विकसित झाला.
प्रश्न : गीतकार म्हणून गीते लिहायला केव्हापासून सुरुवात केली. गीतांचा आशय काय राहिला?
१९६९ पासूनच मी गीते लिहायला सुरुवात केली. माझ्या गीतांचा आशय कायम सामाजिक आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा पगडा असलेले व्यसनाधीनता, युवक आर्थिकसंपन्न होत नाही तोपर्यंत राजकारणापासून दूर, शिक्षण हीच शेती तसेच बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा त्रिकोण हे राहिले आहेत. १९७१ला मी शिक्षण विभागात काम केले व त्यानंतर १९७८ ते २००९ पर्यंत मध्य रेल्वेतची पार्सल सुपरिटेंडेंट म्हणून काम केले. या काळात मला रेल्वेतील सहकार्यामुुळे मिळालेला वेळ खऱ्या अर्थाने लिखाणासाठी प्रवृत्त करून गेला.
प्रश्न -आपल्या सामाजिक आशयातील गीतांचे काही ओव्या या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहेत त्या ओव्याबद्दल थोडे काही सांगा?
‘भीमाच्या अंगचे पाणी, आहे का कुणाचं
याने बगीच्या फुलविला, उभ्या बाभूई बनात’
या शब्दांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बाभुळ वनासारख्या सामाजिक दैना अवस्थेला बगिच्यासारख्यात वैचारिक रूपांतर करून बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व विशद केले आहे.
‘थांबा हो थांबा गाडीवान दादा’
या गीतात बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रसंग लेख रेखाटला आहे.
‘दोनच राजे इथे गाजले
कोकण पुण्य भूमीवर,
एक त्या रायगडावर
एक चवदार तळ्यावर’
या गीतांमधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्त्व वर्णन केले आहे.
‘गुलामी का टूट गया जाल है मेरे भीम का कमाल’
यातून बाबासाहेबांनी तत्कालीन गुलामगिरीच्या परिस्थितीवर केलेले मात व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध प्रचलित आणि आवडते शायरी तसेच डीजे साँग म्हणून
‘उमर मे बाली, भोली भाली
शिल की झोली हुं
भीमराज कि बेटी मै तो
जय भीम वाली हु!’
या गीताचा उल्लेख करता येतो.