सावधान, बेशिस्त पार्कींग केली तर येईल घरपोच मेमो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:55 PM2019-04-02T12:55:55+5:302019-04-02T12:56:07+5:30
ई-चलन : अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना पाठविली दंडाची पावती जळगाव : रस्त्यावर कुठेही बेशिस्तपणे वाहन पार्कींग केले ...
ई-चलन : अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना पाठविली दंडाची पावती
जळगाव : रस्त्यावर कुठेही बेशिस्तपणे वाहन पार्कींग केले तर यापुढे वाहतूक पोलीस बोलायला येणार नाही.आता अशा वाहनांचा मोबाईलमध्ये फोटो घेऊन तुमच्या घरीच दंडाची पावती धडकणार आहे. याची प्रत्यक्ष सुरुवात शहर वाहतूक शाखेने केली असून अडीच महिन्यात २ हजार ८३१ जणांना घरपोच मेमो पाठविण्यात आला आहे. त्यापैकी १ हजार २४१ जणांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाऊन दंड भरला आहे. ही रक्कम ३ लाख १९ हजार ६०० रुपये इतकी वसूल झाली आहे. अजून १ हजार ५९० जणांकडून दंडाची रक्कम वसूल होणार आहे. तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संकल्पनेतून विकसीत झालेली ई-चलन प्रणाली ३ जानेवारी पासून कार्यान्वित झाली. ई-चलन प्रणालीसाठी खास अशा यंत्रणेसह एक मोठे मॉनेटर, प्रिंटर संगणक प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. मोठ्या मॉनेटरवर चौक व तेथील नियम तोडणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र स्पष्टपणे दिसते. यासाठी सहा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीसच घेताहेत फोटो
कारवाईच्यावेळी पोलिसांशी वाद होतात. त्यामुळे आता शहरात बेशिस्त पार्कींग व वाहतूक कोंडी होत असेल तर पोलीस नियमभंग करणाºया वाहनाचे फोटो घेऊन ते ई-चलनसाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाठविले जाते. तेथून मेमो तयार होऊन तो वाहनधारकाच्या पत्यावर जातो. शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांकडून फोटो काढायला सुरु झाली आहे. विशेष म्हणजे साामान्य नागरिकही अशा वाहनांचे फोटो काढून वाहतूक शाखेकडे पाठवू शकतात.
५६ कॅमेऱ्यांची नजर
शहरात पोलीस दलाच्यावतीने ५६ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. त्यांद्वारे नियम मोडणाºया वाहनाचे चित्र वाहतूक शाखेतील नियंत्रण कक्षात दिसेल. तेथील आॅपरेटर त्या गाडीच्या चित्रावर क्लिक करताच त्या वाहनाचे स्नॅप शॉर्ट घेतले जातात. त्यानंतर वाहनाचे सॉफ्टवेअर असलेल्या एका संगणकावर त्या वाहनाचा क्रमांक टाकला जातो. या क्रमांकावरुन वाहनाबाबची इत्यंभूत माहिती येते. गुन्ह्याचा प्रकार टाकल्यानंतर त्यासाठी असलेले दंडाचे शुल्क, घटनास्थळ, तारीख, वेळ व फोटो असलेली प्रतच बाहेर येते. ही प्रत (मेमो) वाहनधारकाच्या मुळ पत्त्यावर पाठविले जात आहे. मेमोवर वाहनधारकाने नेमकी काय चुक केली याचे छायाचित्रही राहत असल्याने चूक नाकारताच येत नाही.
गर्दी, अपघात, वाहतूक कोंडीवरही नियंत्रण
या प्रणालीचा नुसते वाहतूक नियमाचे उल्लंघन इतकाच उपयोग होत नाही, तर रस्त्यावर कुठे अपघात झाला, कुणाची चूक आहे, रॅश ड्रायव्हींग, वाहतूक कोंडी कुठे झालेली आहे यावरही नियंत्रण ठेवले जात आहे. त्याशिवाय मोकळ्या रस्त्यावर मोबाईलवर बोलणे, तीन सीट याचेही चित्रिकरण होत आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक घटना या सीसीटीव्हीत कैद होत आहे. आकाशवाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, स्वातंत्र चौक, जिल्हा रुग्णालय, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा थांबा, नेहरु पुतळा, सरस्वती डेअरी, टॉवर चौक, भीलपुरा, असोदा रोड, रथ चौक, सुभाष चौक, बेंडाळे चौक आदी ठिकाणी हे ५६ कॅमेरे आहेत.