जळगावात उद्घाटनापूर्वीच नाट्यगृहाच्या तळाघराच्या छताला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:24 PM2018-07-20T12:24:37+5:302018-07-20T12:29:19+5:30
करोडो रुपये खर्च करुन, उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाच्या तळघरातील छताची, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याचा प्रकार गुरुवारी आढळला.
जळगाव : करोडो रुपये खर्च करुन, उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाच्या तळघरातील छताची, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याचा प्रकार गुरुवारी आढळला. मनपा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम या तळघरात ठेवण्यात आला होता. मात्र, गळतीमुळे तळघरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, यावर उपाय म्हणून मनपा कर्मचाºयांनी गळतीच्या ठिकाणी टाक्या आणि घमेले ठेवून निवडणूक अधिकाºयांना प्रशिक्षणासाठी सोय करुन दिली.
महाबळ रस्त्यालगत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करुन, उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाचे नुकतेच काम पूर्ण झाले असून, हे नाट्यगृह उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असल्याने, मनपा प्रशासनातर्फे आगामी मनपा निवडणूकीसाठी १९ जुलै रोजी सकाळपासून कर्मचाºयांना मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन या ठिकाणे केले होते. यासाठी सकाळी आठपासूनच मनपा कर्मचाºयांची या ठिकाणी तयारी सुरु होती.
प्रशिक्षणाचे काही कार्यक्रम नाट्यगृहाच्या सभागृहात तर काही नाट्यगृहाच्या तळघरात आयोजित करण्यात आले होते. येथे पोहचल्यानंतर तळघरात पाणीच पाणी दिसल्याने अधिकारी व कमचारी संकटात पडले. त्यावर उपाय म्हणून घमेले व पाण्याच्या टाक्यांचा वापर करण्यात आला.
नाट्यगृहाच्या छताला नेमकी कुठे गळती सुुरु आहे. या संदर्भात आज पाहणी करतो. ज्या ठिकाणच्या छताला गळती सुरु असेल. त्या ठिकाणी लगेच दुरुस्ती करण्यात येईल.
-प्रशांत सोनवणे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम