तीन लाखांचे उत्पन्न आले अवघ्या तीन हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:25 AM2021-05-05T04:25:42+5:302021-05-05T04:25:42+5:30
जळगाव आगार : संचार बंदीमुळे दररोजचा तीन ते चार लाखांचा फटका जळगाव एस.टी.आगारातील स्थिती लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...
जळगाव आगार : संचार बंदीमुळे दररोजचा तीन ते चार लाखांचा फटका
जळगाव एस.टी.आगारातील स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या महामंडळातर्फे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच बसेस सोडण्यात येत असून, रविवारी बहुतांश अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी असल्याने हे कर्मचारी आगाराकडे फिरकले नाहीत. त्यामुळे जळगाव आगारातून रविवारी दिवसभरात फक्त एकच फेरी होऊन, त्या फेरीचे अवघे तीन हजार रुपये महामंडळाला मिळाले आहे. कोरोना काळातही दररोज किमान तीन ते चार लाखांपर्यंत येणारे उत्पन्न,संचार बंदीत तीन हजारांवर आल्याने आधीच तोट्यात असलेले महामंडळ अधिकच तोट्यात जातांना दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे संचार बंदी लागू करण्यात आली असून, या कालावधीत महामंडळाची सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच बसेस सोडण्यात येत आहेत. त्यानुसार जळगाव आगारातर्फे अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच धुळे, चाळीसगाव, जामनेर, भुसावळ या ठिकाणी बसेस सोडण्यात येत आहेत. दिवसभरात अशा पाच ते सात फेऱ्या होत असून, यातून जळगाव आगाराला २५ ते ३० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र, रविवारी २ मे रोजी अत्यावश्यक सेवेतील शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने जळगाव आगारातून फक्त धुळ्याकडे एक फेरी रवाना झाली. या फेरीतून महामंडळाला फक्त अवघे तीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या फेरीतून डिझेल खर्चही निघाला नसल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो:
तर साधारणतः १ कोटींचे उत्पन्न बुडणार
संचार बंदीच्या आधी महामंडळाची सेवा राज्यभरात सुरू होती. यात जळगाव आगाराचे दिवसाला तीन ते चार लाख रुपये उत्पन्न येत होते. मात्र, संचार बंदी लागू झाल्यापासून दररोज २५ ते ३० हजार उत्पन्न येत असून, दररोजचे तीन लाखांचे उत्पन्न घटले आहे. या दैनंदिन उत्पन्नाच्या सरासरी नुसार जळगाव आगाराचे संचार बंदीच्या महिनाभरात १ कोटींचे उत्पन्न बुडणार असल्याचे सांगण्यात आले.