रुग्णवाढ अडीचपटीने, ॲन्टिबॉडीजमध्ये वाढ केवळ दुपटीनेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:15 AM2021-07-26T04:15:28+5:302021-07-26T04:15:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चौथ्या सिरो सर्व्हेत जिल्ह्यातील ५१ टक्के ॲन्टिबॉडीजचे प्रमाण आढळून आले आहेत. यातून एकत्रित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चौथ्या सिरो सर्व्हेत जिल्ह्यातील ५१ टक्के ॲन्टिबॉडीजचे प्रमाण आढळून आले आहेत. यातून एकत्रित अर्ध्या लोकसंख्येला कोरोना होऊन गेला असा अंदाज यातून बांधता येतो. मात्र, ॲन्टिबॉडीज् या शरीरात केवळ सहा महिन्यांपर्यंतच राहू शकतात, शिवाय कोरोना विषाणूने स्वत:मध्ये केलेल्या बदलांपुढे त्या किती प्रभावी ठरतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने सर्वांनीच काळजी घेणे हाच कोरोनापासून संरक्षणात्मक उपाय असल्याचे तज्ञ सांगत आहे. दरम्यान, गेल्या सीरो सर्व्हेनंतर जिल्ह्यात तिपटीने रुग्णवाढ झाली मात्र, ॲन्टिबॉडीज् आढळून येण्याचे प्रमाण केवळ दुपटीने वाढले आहे. त्यामुळे वास्तव आणि सर्व्हे यात फरक असल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यात २५ डिसेंबर रोजी तिसऱ्या सिरो सर्व्हेसाठी नमुने गोळा करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात याचा अहवाल समोर आला होता. हा अहवाल सर्वांनाचा धक्कदायक होता. दुसऱ्या व तिसऱ्या सर्व्हेत केवळ तीन टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती. हर्ड इम्युनिटीचे सर्व अंदाज त्यावेळी चुकले होते व त्यानंतर दुसऱ्या लाटेत भयावह रूप समोर आले होते.
तिसऱ्या लाटेबाबत या सर्व्हेनुसार अंदाज बांधणे कठीण
तिसरी लाट, डेल्टा प्लस व्हेरियंट, विषाणूमधील जनुकीय बदल या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर आताचा ॲन्टिबॉडीज् अहवाल यावरून तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधताच येणार नसल्याचे तज्ञ सांगतात. अन्य देशांची परिस्थिती बघता काही देशांमध्ये झालेली रुग्णवाढ बघता तिसरी लाट येण्याची शक्यता आहेच. मात्र, ती येईलच असे ठाम सांगता येणार नाही. मात्र, त्यादृष्टीने सजग राहणे महत्त्वाचे आहे. साधारण ऑगस्ट महिन्यात रुग्णवाढ होण्याची शक्यता असल्याचेही तज्ञांकडून सांगितले जाते.
दुसऱ्या लाटेत अनेकांना पुन्हा कोविड
अनेक रुग्णांना कोरोनाची पुन्हा पुन्हा लागण झाल्याचे दुसऱ्या लाटेत अधिक समोर आले आहे. यात अनेक जणांनी कोविडचे दुसरे डोस घेतल्यानंतरही ते बाधित झाले होते. म्हणून ॲन्टिबॉडीज् आढळल्या म्हणून तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात या गैरसमजातून नियमांना फाटा देणे धोकादायक ठरू शकते, असे डॉ. भाउराव नाखले यांनी सांगितले.
अशी झाली रुग्णवाढ
२५ डिसेंबर २०२० : ॲन्टिबॉडीज् २८. ३४ टक्के लोकांमध्ये ॲन्टिबॉडीज्
कोरोनाचे रुग्ण: ५५५९७
२२ जून २०२१ : ॲन्टिबॉडीज् ५१ टक्के नागरिकांमध्ये
कोरोनाचे एकूण रुग्ण : १४२५५५
सात महिन्यात ८६९५८ रुग्ण वाढले
म्हणून बुस्टर डोसची कल्पना
कोविडशी लढणाऱ्या ॲन्टिबॉडीजचे आयुष्य हे सहा महिने ते एक वर्षापर्यंत असते, असे असल्याने कोविड प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना सहा महिने ते एक वर्षांच्या कालावधीत तिसरा डोस देणे याला बुस्टर डोस म्हटले जाते. आपल्याकडे लसींचा पुरेसा साठा नसल्याने याबाबत अद्याप नियोजन नसल्याची माहिती औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली.