लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या संसर्गात प्रतिकारक्षमता कमी झाल्याने व काही औषधांचा अतिरिक्त वापर झाल्याने त्याचे साईड इफेक्ट आता समोर येत आहेत. त्यात रेमडेसिविर इंजेक्शनने विविध अवयवांवर होणारे परिणाम असतील किंवा स्टेरॉईडच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे म्युकोरमायकोसिस हे फंगल इंफेक्शन असेल. यातील म्युकोरमायकोसिसचे रुग्ण गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.
कोरोनातून बरे होण्यासाठी रुग्णाच्या प्रकृतीनुसार औषधांचे प्रमाण वाढविण्यात येत असते. सौम्य लक्षणे असलेल्यांना मर्यादीत औषधांचा डोस देण्यात येतो. मात्र, गंभीर व मध्यम स्वरूपातील रुग्णांना वेगवेगळी औषधी दिली जातात. सद्यस्थितीत कोरोनावर रामबाण असे औषध नसल्याने संसर्गाचे प्रमाण कमी करणारी औषधे वापरली जात आहेत. काेरोनावरील उपचार करताना रेमडेसिविरचा सर्रास वापर होत असल्याने याचे अनेक दुष्परिणामही होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले होते. निकषात नसताना त्याचा वापर केल्यास किडनी व हृदयावर याचे परिणाम होत असतात, असे तज्ज्ञांनी सांगितले होते.
पोस्ट कोविडकडे दुर्लक्ष
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट कोविड ओपीडी मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्याने कोविडनंतर उद्भवणाऱ्या त्रासांवर व विकारांबाबत आता शासकीय यंत्रणेत समुपदेशन किंवा उपचार उपलब्ध नाहीत. खासगी रुग्णालयात या विविध व्याधींचे उपचार केले जात आहेत.
म्युकोरमायकोसिसचा धोका वाढला
गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत खासगी रुग्णालयांत म्युकोरमायकोसिसच्या शंभरपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. अनेकांना मुंबई, पुणे येथे पाठविण्यात आले आहे. एका खासगी डॉक्टरांकडे म्युकोरमायकोसिस आजाराने त्रस्त जवळपास ६० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
काय कारणे
अनियंत्रित मधुमेह, स्टेरॉईडचा अधिक वापर किंवा कमी दिवसात जास्त डोस, प्रतिकारक्षमता कमी असणे किंवा आधीच काही व्याधी असणे अशा रुग्णांना म्युकोरमायकोसिसचा धोका अधिक आहे. याला फंगल इफेक्शन म्हणूनही संबोधले जाते. तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाकाला सूज येणे, सायनस, रक्तसंचय अशी याची काही लक्षणे आहेत.
कोरोनाग्रस्त काही रुग्णांमध्ये हे फंगल इंफेक्शन आढळत आहे. हा अत्यंत दुर्मीळ आजार असून, याने कोरोनात आता डोके वर काढले आहे. यात कान, नाक, घसा तज्ज्ञ, मुखरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, अशा विविध तज्ज्ञांकडून उपचारांची आवश्यकता असते. अनियंत्रित मधुमेह, स्टेरॉईडचा अतिरिक्त वापर, प्रतिकारक्षमता कमी असणाऱ्यांना याचा धोका अधिक असतो. प्राथमिक पातळीवर याचे नियंत्रण होणे आवश्यक असते.
- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ
स्टेरॉईडच्या अतिरिक्त वापराने उच्च रक्तदाब, मधुमेह, ग्लुकोजची पातळी बदल, स्नायूचे आजार, हाडे ढिसूळ होणे, अल्सर, स्थूलपणा हे विकार होऊ शकतात, त्यामुळे स्टेरॉईडचा वापर हा जपूनच केला गेला पाहिजे.
- डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख, औषधवैद्यक शास्त्र विभाग