लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईनचा दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी वीज कृती समितीच्या नेतृत्वाखाली वीज कर्मचारी २४ मेपासून बेमुदत संपावर गेले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
वीज कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रथम लसीकरण करावे, कोविड-१९ मुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला ५० लाख रुपये अनुदान द्यावे, तिन्ही कंपन्यांकरिता एम. डी. इंडिया या जुन्याच टीपीएची तत्काळ नेमणूक करावी, वीज बिल वसुलीकरिता सक्ती करू नये, या मागण्यांसाठी राज्य संयुक्त सचिव पी. वाय. पाटील, प्रफुल्ल पाटील, श्याम पाटील, कैलास रोकडे, बन्सीलाल पवार, सुरेश धनगर, रवींद्र पाटील, सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वितरण उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर घोषणा देऊन आंदोलन केले.
शासन मागण्या मंजूर करत नाही, तोपर्यंत कोविड सेंटर, पाणीपुरवठा, जिल्हाधिकारी, तहसील कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, बंद वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, मात्र इतर कामे बंद करून अत्यावश्यक सेवा नसलेला वीज पुरवठा बंद पडल्यास सुरू केला जाणार नाही, असे समितीतर्फे सांगण्यात आले.