जळगाव : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात मृत्यूत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. ५५ टक्के अपघात हे भरधाव वेगाने वाहने चालविण्यामुळे झालेले आहेत. विशेष म्हणजे अपघातात मृत झालेल्या ७० टक्के व्यक्ती या १८ ते ४५ वयोगटातील अर्थात कुटुंबातील कर्त्या व्यक्ती होत्या. त्यातदेखील ३२ टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचेच असल्याचे उघड झाले आहे.
जगातील एकूण रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होत आहे. २०१८ मध्ये देशात ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले तर १ लाख ५१ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ लाख ६९ हजार ४१८ जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी रस्ता सुरक्षा अभियानात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सादर केली. जळगाव जिल्ह्यात मागील वर्षभरात ७५२ अपघात झाले असून त्यात ४७१ जणांचा मृत्यू झालेला आहे तर ५१४ जण जखमी झालेले आहेत. २०१९ च्या तुलनेत अपघाताच्या संख्येत घट झालेली असली तरी मृत्यूमध्ये ४ टक्के वाढ झालेली आहे. २०१९ मध्ये ८३५ अपघात झाले होते तर ४५४ जणांचा मृत्यू झाला होता.
या कारणांमुळे होतो अपघात
रस्त्यावरील अपघाताचे मुख्यत्वे कारणे अतिवेगाने वाहन चालविणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, ओव्हरटेकिंग, लेनकटिंग, रॅश ड्रायव्हिंग, मद्यपान करून वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, रात्रीच्या वेळी वाहन चालविणे आदी प्रमुख कारणे समोर आलेली आहेत. देशातील एकूण रस्त्याच्या लांबीपैकी २ टक्के लांबी राष्ट्रीय महामार्गाने व्यापलेली असताना याच महामार्गावर सर्वाधिक ३५ टक्के अपघात झालेले आहेत. राज्य मार्गावर २५ टक्के अपघात झाले आहेत. ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले आहे, त्यांचा जीव या अपघातात वाचल्याचेही समोर आले आहे. अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये पादचारी, सायकलस्वार व दुचाकीस्वार यांची संख्या ५४ टक्के आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील अपघातांची संख्या दरवर्षी १० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
एक नजर अपघातांवर
देशातील अपघातांची संख्या : ४,६७,०४४
देशातील अपघातांतील मृत्यू : १,५१,४१७
जळगाव जिल्हा अपघात : ७५२
जळगाव जिल्हा अपघातात मृत्यू : ४७१
अपघातात मृत झालेल्या तरुणांची संख्या : ७० टक्के
अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू : ३६.५ टक्के